अहिल्यानगर-संभाजीनगर रस्त्याची खड्डयांनी चाळण, संतप्त नागरिकांचा घोडेगावात ‘रास्ता रोको’

अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर पडलेल्या प्रचंड खड्डयांमुळे त्रासलेले नागरिक आज रस्त्यावर उतरले. या मार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात घडत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने आज घोडेगाव येथे एक तास ‘रास्ता रोको’ करून चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात रांगा लागल्या. दरम्यान, जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी दहा दिवसांच्या आत सर्व खड्डे खडी व डांबराने बुजवले जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ‘रास्ता रोको’ आंदोलन मागे घेण्यात आले.

अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग गेल्या एक महिन्यापासून खड्डेमय झाला असून, या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण झाला आहे. वाहनचालकाला आपला जीव मुठीत धरून प्रवास करत लागत आहे. नादुरुस्त झालेल्या या रस्त्यावर आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. आठ दिवसांपूर्वी संबंधित खात्याला येथील घोडेगावमधील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. याच पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी आज महामार्ग रोखून धरत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. एक तास चाललेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनात संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय रस्त्यावर ठाण मांडून बसण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सध्या पावसामुळे सर्वत्र चिखल व खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

घोडेगाव हे जनावरांसाठी प्रसिद्ध असलेले बाजार तसेच कांदा मार्केटमुळे येथे वाहनाची प्रचंड ये-जा चालू असते. महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. भाजीपाला, दूध वाहतूक, शाळकरी मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून सततचा पाऊस; शिवाय पडणाऱ्या खड्डयांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा आज उद्रेक झाला. घोडेगाव येथील बसस्थानकाजवळ आज सकाळी दहा वाजता हजारो नागरिक रस्त्यावर ठाण मांडून बसले. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आला.

अशोक नाना येळवंडे, डॉ. ज्ञानदेव कोरडे, सचिन देसरडा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेवासा विधानसभा संघटक पंकज लांबते, शरद सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, सुधीर वैरागर, अविनाश येळवंडे, नाथा जाधव, सचिन चोरडिया, सुरेश वैरागर, बाबासाहेब दारकुंडे, शिवाजी सोनवणे, बबनराव येळवंडे, वसंतराव सोनवणे आदींनी आपल्या भाषणातून भाजप महायुती सरकारचा समाचार घेतला.

दरम्यान, कार्यकारी अभियंता पाटील यांनी या खड्डे बुजवण्याच्या रस्त्याचे टेंडर निघाले असून, दहा दिवसांच्या आत सर्व खड्डे खडी व डांबराने बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

Comments are closed.