अहमदाबाद विमान अपघातानंतर सरकारी अधिकाऱ्याकंडून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार

अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाचा अपघात अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्या ‘एअर इंडिया फ्लाइट 171’ च्या (Air India flight 171 crash) अपघातासंदर्भात एक खळबळजनक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे.  या विमान अपघाताच्या मदतकार्याशी संबंधित एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला असून या संदर्भातील काही व्हिडिओ व्हायरल झाले आहे. या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे कि, अलीकडेच घडलेल्या अपघाताच्या मदतकार्याशी संबंधित एक मोठा भ्रष्टाचार (Corruption) उघडकीस आला आहे. पीडित लोक हालअपेष्टा सोसत असताना, केवळ खर्च वाढवून सांगण्याच्या उद्देशाने ढिगारा हटवण्याची प्रक्रिया जाणीवपूर्वक एका महिन्याहून अधिक काळ लांबवण्यात आली, असा आरोप या व्हायरल व्हिडिओमधून केला जात आहे. पण यातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या मदतकार्यादरम्यान केवळ “चहा आणि नाश्त्यासाठी” (अल्पोपहारासाठी) तब्बल 16 लाख रुपयांचे बिल सादर करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही अधिकारी एखाद्या मानवी शोकांतिकेचे रूपांतर पैसे कमावण्याच्या संधीत कसे करतात, याचे हे एक ठळक आणि किळसवाणे उदाहरण असल्याच्या प्रतिक्रिया आता समाज माध्यमांमधून उमटू लागल्या आहे.

Chai and Snacks Corruption Scandal: अल्पोपहार घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

प्रशासकीय व्यवस्थेचे हे उघड अपयश आणि जनतेच्या पैशांची ही सर्रास लूट यामुळे ऑनलाइन विश्वात जनतेच्या संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. नेटकरी या प्रकरणाची तातडीने राजकीय जबाबदारी निश्चित करण्याची आणि या “अल्पोपहार घोटाळ्याची” उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. हा व्हिडिओ आपल्या प्रशासकीय यंत्रणेत खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराचे एक कठोर वास्तव समोर आल्याचं बोललं जात आहे. जिथे आपत्तीच्या ठिकाणीही, जलद मदत आणि पुनर्वसनाऐवजी स्वतःचे खिसे भरण्यावरच अधिक भर दिला जातो. हे आपत्तीतील गिधाडे (disaster vultures) उघडे पाडण्यासाठी प्रेक्षक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत आणि या १६ लाखांच्या ‘चहा घोटाळ्यात’ सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

Ahmedabad : धक्कादायक! अहमदाबाद महानगरपालिकेकडून 16 लाखांहून अधिक खर्चाला मंजुरी

धक्कादायक बाब म्हणजे अहमदाबाद महानगरपालिकेच्या (AMC) स्थायी समितीने गुरुवारी, 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या ‘एअर इंडिया फ्लाइट 171’ च्या अपघातानंतर मृतदेहांचा शोध घेण्याचे आणि ढिगारा हटवण्याचे काम करणाऱ्या पथकांना अल्पोपहार पुरवण्यासाठी झालेल्या 16 लाखांहून अधिक खर्चाला मंजुरी दिली. स्थायी समितीच्या कार्यसूचीमध्ये नमूद केल्यानुसार, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक यांचा समावेश असलेल्या या पथकांना चहा, नाश्ता, पाण्याच्या बाटल्या, अमूल दूध आणि बिस्किटे पुरवण्यात आली होती. संबंधित संस्थांनी 16,74,405 रुपयांची बिले सादर केली असून, वरील व्यवस्थांसाठी ‘कार्योत्तर मंजुरी’ (ex post facto approval) मागितली होती, असेही यात नमूद करण्यात आले. ही पथके अहमदाबादमधील ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’ येथील अपघात स्थळासह एकूण चार ठिकाणी तैनात करण्यात आली होती.

आणखी वाचा

Comments are closed.