बोधेगावच्या पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकर्याची हत्या, मुंडकं मंदिराशेजारी तर धड विहिरीत आढळलं
अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नामदेव दहातोंडे असे 70 वर्षीय हत्या झालेल्या सेवेकऱ्याचे नाव आहे. नामदेव दहातोंडे हे गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते. त्यानंतर आता त्यांचा मृतदेह मंदिराशेजाच्या विहिरीत आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे.
धड नसलेलं मुंडकं सापडलं
नामदेव दहातोंडे हे पहिलवान बाबा मंदिराची गेल्या पंधरा वर्षांपासून साफसफाई करत होते. 26 जानेवारी पासून दहातोंडे हे बेपत्ता असल्याची तक्रार तेथील पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलिसात दाखल केली होती. मात्र मंदिराशेजारी सडलेला वास येत असल्याने तपासले असता त्या ठिकाणी धड नसलेले मुंडके असल्याचे दिसून आले.
धड विहिरीत सापडलं
त्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. मात्र धड सापडत नसल्याने पोलिस त्याचा शोधाशोध करत असता मंदिरापासून काही अंतरावरील एका विहिरीतून सडलेल्या अवस्थेत वास येत असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी तपासले असता विहिरीत पुरलेल्या अवस्थेत धड दिसून आले.
परिसरात भीतीचं वातावरण
अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, पोलिस उपअधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पुढील तपासाचे आदेश दिले आहे. मात्र या क्रूर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. ही हत्या नेमकी कशामुळे झाली याविषयी चर्चेला उधाण आलं आहे.
ही बातमी वाचा:
Comments are closed.