AI ने हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आणला

हैद्राबाद बिर्याणी विक्री साखळीतून झाला पर्दाफाश : 70 हजार कोटीची करचुकवेगिरी

वृत्तसंस्था/हैद्राबाद

कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या (एआय) माध्यमातून भारतात 70 हजार कोटी रुपयांचा एक करचुकवेगिरी घोटाळा उघड झाला आहे. हा घोटाळा हैद्राबादी बिर्याणी विक्री केंद्रांच्या माध्यमातून करण्यात येत होता. हा घोटाळा खाद्यपेय उद्योगात घडलेला असून आता त्याची सखोल चौकशी केली जात आहे. एआयच्या माध्यमातून जवळपास 60 टेराबाईट्स् इतक्या प्रचंड माहितीचे विश्लेषण त्वरित केले गेल्याने हा घोटाळा उघड झाला. या बिर्याणी विक्री केंद्रांनी जवळपास 70 हजार कोटी रुपयांची उलाढाल दडविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, एआयमुळे  या व्यापक कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान करचुकवेगिरी शोधून काढण्यासाठीही अतिशय उपयुक्त ठरत आहे, ही बाब सिद्ध झाली आहे.

हा घोटाळा 2019-2020 च्या आर्थिक वर्षापासून अत्यंत सुनियोजित पद्धतीने केला जात होता. बिर्याणी विक्री केंद्रांमधून विकल्या गेलेल्या बेहिशेबी अन्न आणि पेय पदार्थांसंबंधीची माहिती गेली सात वर्षे अत्यंत खुबीने दडविण्यात आली होती. गेल्या वर्षी प्राप्तीकरण विभागाला या व्यवहारांसंबंधी शंका उत्पन्न झाली होती. त्यामुळे त्यांनी या बिर्याणी विक्री केंद्रांची बिले आणि इतर कागदपत्रे एआय टूल्सचा उपयोग करुन तपासण्यात आली. ही कागदपत्रे मानवी पद्धतीने तपासण्यात आली असती तर या घोटाळ्याचा पत्ता त्वरित लागला नसता. पण एआय टूल्सच्या उपयोगामुळे हा सर्व घोटाळा अत्यल्प कालावधीत उघड झाला.

अनेक राज्यांमध्ये पाळेमुळे

या घोटाळ्याची पाळेमुळे अनेक राज्यांमध्ये पसरलेली आहेत. तथापि, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये या घोटाळ्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचीही माहिती एआय टूल्सकडून प्राप्त झाली आहे. यात कर्नाटक आघाडीवर आहे. येथे 2 हजार कोटी रुपयांची करचुकवेगिरी झाल्याचे समोर येत आहे. त्यानंतर तेलंगणा 1,500 कोटी आणि तामिळनाडू 1,200 कोटी असे क्रमांक लागत आहेत. प्रत्यक्षात हा घोटाळा सध्या उघड झालेल्या प्रमाणापेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशी केली जात आहे.

विक्री दाखविली कमी

या घोटाळ्यात समाविष्ट असणाऱ्या अनेक खाद्यपेय विक्री केंद्रांनी त्यांची विक्री कमी दाखवून कर चुकविला असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक विक्री केंद्रांनी ग्राहकांना बिले दिली असली तरी ती करअधिकाऱ्यांपासून दडविली आहेत. कर अधिकाऱ्यांना दाखविण्यासाठी वेगळी बिले तयार केली जात असत. ती मूळ बिलापेक्षा कमी रकमेची असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक केंद्रांनी ग्राहकांना दिलेल्या बिलांची माहिती डीलीट केली आहे. तर काही केंद्रांनी ही माहिती डिलीट करण्याचे श्रमही घेतलेले नाहीत. या विसंगतीची माहिती एआयच्या माध्यमातून त्वरित मिळाल्याने हा घोटाळा उघडकीस आला, असे करविभागाचे म्हणणे आहे.

अनेक स्थानी धाडी, शोध

हा घोटाळा बाहेर आल्यानंतर करविभागाने हैद्राबाद आणि विशाखापट्टण येथे प्रथम धाडी घातल्या. त्यानंतर, आता अनेक शहरांमध्ये शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. विक्री कमी दाखवून मोठ्या प्रमाणात प्राप्तीकर आणि वस्तू-सेवा कर चुकविण्यात आला आहे. आतापर्यंत 2 लाख 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल तपासण्यात आली असून चुकविलेला कर 70 हजार कोटींच्या आसपास आहे.

Comments are closed.