आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
एआय वर सुंदर पिचाई: आपण हायपर प्रोग्रेसच्या (hyper progress) उंबरठ्यावर आहोत. एआय प्रत्येकासाठी उपयुक्त बनवण्यासाठी त्याचा धैर्याने (boldly) पाठपुरावा करणे, जबाबदारीने (responsibly) दृष्टिकोन ठेवणे आणि या निर्णायक क्षणी एकत्र काम करणे, गरजेचं असल्याचे मत गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यक्त केले. त्यांनी राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या एआय समिटमध्ये आज संबोधित करताना एआय आव्हान स्वीकारण्यासाठी कानमंत्र दिला. एआय केवळ तंत्रज्ञान नाही तर विज्ञानातील कठीण प्रश्न सोडवण्याचे साधन आहे. गुगल डीपमाइंडने एआयचा वापर करून ‘प्रोटीन स्ट्रक्चर्स’चे भाकीत करण्याचे 50 वर्षांचे आव्हान सोडवले, ज्यासाठी नोबेल पारितोषिकही मिळाले. ही माहिती आता जगासाठी खुली करण्यात आली असून ३ दशलक्ष संशोधक याचा वापर करत असल्याचे ते म्हणाले. एआयचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. सरकारांनी केवळ नियामक (regulators) म्हणून नाही तर नाविन्यपूर्ण बदल घडवून आणणारे (innovators) म्हणूनही काम केले पाहिजे. आपल्याकडे पिढीमध्ये एकदाच मिळणारी आयुष्य सुधारण्याची संधी आहे, आता आपण सर्वांनी मिळून हे काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
स्टॅक एआय हब’ (full stack AI hub) स्थापन करणार
भारतातील पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकीसंदर्भात पिचाई यांनी जाहीर केले की, गुगल विशाखापट्टणमला एक ‘फुल स्टॅक एआय हब’ (full stack AI hub) स्थापन करत आहे. हा भारतातील त्यांच्या 15 अब्ज डॉलर्सच्या पायाभूत सुविधा गुंतवणुकीचा एक भाग आहे. या हबमध्ये ‘गिगावाट-स्केल कॉम्प्युट’ आणि नवीन ‘आंतरराष्ट्रीय सबसी केबल गेटवे’ असेल, ज्यामुळे संपूर्ण भारतात नोकऱ्या आणि प्रगत एआय तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असे पिचाई यांनी सांगितले.
भारतातील शेतकऱ्यांना मदत
ते म्हणाले की, भारतात गुगल सरकारसोबत काम करत असून, गेल्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच लाखो शेतकऱ्यांना एआय-आधारित पावसाचा अंदाज (forecasts) पाठवण्यात आला. हे ‘न्यूरल जीसीएम मॉडेल’ (neural GCM model) मुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा फायदा सर्वांना मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पिचाई यांनी स्पष्ट केले की, आम्ही डिजिटल दरीचे रूपांतर ‘एआय दरी’मध्ये होऊ देऊ शकत नाही. यासाठी कनेक्टिव्हिटीवर भर देत असून, भारत आणि अमेरिका दरम्यान ‘अमेरिका इंडिया कनेक्ट’ उपक्रमांतर्गत चार नवीन सबसी फायबर ऑप्टिक केबल सिस्टीम तयार करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. एआयमुळे कामाच्या स्वरूपात बदल होईल, काही भूमिका स्वयंचलित होतील तर काही नवीन करिअर निर्माण होतील. यासाठी गुगलने 100 दशलक्ष लोकांना डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण दिले आहे आणि नवीन ‘गुगल एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट’लाँच केले आहे. एआयच्या वापरामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. माहितीची सत्यता पडताळण्यासाठी गुगलने ‘सिंथ आयडी’ सारखी साधने तयार केली आहेत, जी पत्रकार आणि नागरिक वापरू शकतात, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.