न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर भीषण अपघात; विमानाची अग्निशमन दलाच्या ट्रकला धडक, 4 कर्मचारी गंभीर जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॅनडातील मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला येणाऱ्या एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाचा ला गार्डिया विमानतळाच्या धावपट्टीवर भीषण अपघात झाला. धावपट्टीवर उतरत असताना या विमानाची धडक अग्निशमन दलाच्या ट्रकला बसली, ज्यामध्ये चार अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकन फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.

फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट ‘फ्लाइटराडार24’ ने दिलेल्या माहितीनुसार, रनवे 4 वर एअर कॅनडा एक्सप्रेसचे बॉम्बार्डियर CRJ-900 विमान आणि पोर्ट अथॉरिटी पोलीस विभागाच्या अग्निशमन गाडीमध्ये ही टक्कर झाली. अपघात झाला तेव्हा विमानाचा वेग ताशी सुमारे 39 किलोमीटर इतका होता. एका अन्य युनायटेड 737 मॅक्स विमानामध्ये विचित्र वास येत असल्याने तिथे आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्या विमानाला मदत करण्यासाठी जात असलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला रनवे ओलांडण्याची परवानगी देण्यात आली होती, त्याच वेळी ही धडक बसली. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये विमानाचा पुढचा भाग पूर्णपणे चुरगळलेला आणि हवेत कललेल्या अवस्थेत दिसत आहे. विमानात सुमारे 100 प्रवासी होते, ज्यामध्ये न्यूयॉर्कमधील ऑर्थोडॉक्स ज्यूंच्या एका गटाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

या अपघातामुळे ला गार्डिया विमानतळावर येणारी सर्व विमाने इतर विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवण्यात आली आहेत. खराब हवामानाचा तडाखा बसलेला असतानाच विमान गेटकडे जात असताना ही विचित्र दुर्घटना घडली. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत जीवितहानी किंवा एकूण नुकसानीचा सविस्तर आकडा जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

Comments are closed.