एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान हार्ड लँडिंग करते

विमानाचे पुढचे चाक तुटले : थायलंडमधील घटनेत 141 जणांचे जीव वाचले : मोठी दुर्घटना टळली : घटनेची

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हैदराबादहून फुकेतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानाचे नोज व्हील तुटल्याने गोंधळ उडाला. ही घटना बुधवार, 11 मार्च रोजी घडली. याप्रसंगी 135 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स असे एकूण 141 जण उपस्थित होते. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना न घडल्याने सर्व 141 जणांचे प्राण वाचले. सदर विमान भारतीय कंपनीचे असल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) या प्रकरणाची दखल घेऊ शकते. बोईंग 737- एमएएक्स-8 विमान आधीच जागतिक देखरेख आणि छाननीखाली असल्यामुळे या घटनेची सविस्तर चौकशी होण्याची शक्यता आहे.

थायलंडमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइट आयएक्स-938 ने हार्ड लँडिंग केल्याने विमानतळ अधिकारी आणि प्रवाशांमध्ये काही काळासाठी चिंता निर्माण केली. तथापि, परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर्स जखमी झाला नाही. सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसने एक निवेदन जारी करून घटनेची माहिती दिली आहे. 11 मार्च रोजी हैदराबादहून फुकेतला जाणाऱ्या आयएक्स-938 विमानात फुकेत विमानतळावर पोहोचल्यानंतर नोज व्हीलमध्ये तांत्रिक समस्या आली, असे एअरलाइनने म्हटले आहे. या समस्येदरम्यान क्रूने सर्व मानक सुरक्षा प्रक्रियांचे पालन केले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. एअरलाईनने प्रवाशांचे, फुकेत विमानतळ अधिकाऱ्यांचे आणि इतर मदत यंत्रणांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

लँडिंगचा व्हिडिओ समोर

सोशल मीडियावर विमानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून त्यामध्ये विमान हार्ड लँडिंग करत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले होते. हे लँडिंग इतके जोरदार होते की विमानाचे नोज व्हील वेगळे झाले आणि नोज लँडिंग गियर खराब झाले, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Comments are closed.