टेकऑफ करताच एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, मुंबईत इमरजन्सी लॅडिंग; दोन फ्लाईट रद्द

टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली. एअर इंडियाचे हे विमान मुंबईहून नेवार्ककडे उड्डाण करत होते. तपासणीनंतर एअरलाईनने या फ्लाइटसह नेवार्कहून मुंबईकडे येणारी फ्लाइटही रद्द केली आहे.
दरम्यान, फ्लाइट रद्द झाल्यामुळे विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय करून देण्यात आली आहे. तसेच, पर्यायी फ्लाइटचा पर्यायही देण्यात आला आहे. विमानतळ सूत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडियाची एआय-191 ही फ्लाइट मुंबई विमानतळावरून रात्री सुमारे 1 वाजून 11 मिनिटांनी नेवार्कसाठी निघणार होती. ही फ्लाइट ठरलेल्या वेळेपेक्षा सुमारे 40 मिनिटांच्या उशिराने नेवार्कसाठी निघाली.
हे विमान गल्फ ऑफ ओमानच्या परिसरात पोहोचण्याच्या बेतात असतानाच पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून पायलटने विमान पुन्हा मुंबई विमानतळावर परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमानाची आपत्कालीन लँडिंग मुंबई विमानतळावर करण्यात आली. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित आहेत.
लँडिंगनंतर एअरलाईनच्या तांत्रिक टीमने विमानाची तपासणी केली. तपासणीनंतर विमानाला उड्डाणासाठी अयोग्य घोषित करण्यात आले. तसेच, विमान उपलब्ध नसल्यामुळे एअरलाईनने ही फ्लाइट रद्द केली. यासोबतच, नेवार्कहून मुंबईकडे येणारी फ्लाइटही रद्द करण्यात आली आहे.
Comments are closed.