वजन वाढल्यास आता पगारावर पडणार कुऱ्हाड, एअर इंडियाचा केबिन क्रू कर्मचाऱ्यांना इशारा
एअर इंडियाने (Air India) आपल्या केबिन क्रू कर्मचाऱ्यांच्या फिटनेसबाबत अत्यंत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियाच्या नवीन नियमांनुसार, जे कर्मचारी निर्धारित फिटनेस मानकांनुसार तंदुरुस्त नसतील, त्यांच्या पगारात कपात केली जाऊ शकते किंवा त्यांना विनापगार रजेवर पाठवले जाऊ शकते.
एअर इंडियाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केबिन क्रू सदस्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर आता अधिक बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा Body Mass Index (BMI) आणि शरीरातील चरबीचे प्रमाण (Body Fat) नियमितपणे तपासले जाईल. ज्या कर्मचाऱ्यांचे वजन ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळेल, त्यांना वजन कमी करण्यासाठी ठराविक कालावधी दिला जाईल.
दिलेल्या मुदतीत वजन कमी न झाल्यास, संबंधित कर्मचाऱ्याला ‘नॉन-फ्लाइंग’ ड्युटीवर ठेवले जाईल. तसेच कंपनीने दिलेल्या वेळेत त्या कर्मचाऱ्याने वजन कमी नाही केले तर पगार कपात केली जाऊ शकते किंवा तत्त्वावर घरी बसवले जाऊ शकते.
एअर इंडिया जागतिक स्तरावर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. केबिन क्रू हा विमान कंपनीचा चेहरा असतो, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि ग्रूमिंग आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, असा टाटा समूहाचा आग्रह आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात कर्मचाऱ्यांची चपळता आणि आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांचा फिटनेस महत्त्वाचा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
एअर इंडियाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही कर्मचारी संघटनांनी या नियमांना ‘भेदभावपूर्ण’ आणि ‘अन्यायकारक’ म्हटले आहे. वाढते वय किंवा आरोग्याच्या काही विशिष्ट समस्यांमुळे वजन वाढू शकते, अशा वेळी थेट पगारावर परिणाम करणे चुकीचे असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Comments are closed.