खराब हवेमुळे मुंबईकरांची घुसमट; आरोग्यावर परिणाम होण्याची चिंता

गेल्या आठवड्यापासून मुंबईत थंडीची तीव्रता कायम आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी पहाटे मुंबईकरांना थंडीने हुडहुडी भरवली. मात्र याचदरम्यान हवेच्या खराब गुणवत्तेमुळे नागरिकांना अस्वस्थ वाटू लागले आहे. शहर आणि उपनगरांच्या अनेक भागांत हवेची गुणवत्ता खराब बनली आहे. त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची चिंता सतावत आहे. दिल्लीप्रमाणेच मुंबईतील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे.

मुंबई शहरातील खराब हवेमुळे दमा, फुफ्फुसाचे आजार, ह्रदयविकार तसेच श्वसनाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना प्रदूषित हवेचा अधिक त्रास होत आहे. ‘समीर’ ॲपच्या आकडेवारीनुसार, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 126 अंकांवर नोंदवला गेला. एक्यूआयची ही पातळी नागरिकांच्या आरोग्यावर परिणामकारक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

रविवारी सकाळी सांताक्रूझमध्ये 17 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. काही भागांमध्ये हवामान अंशतः ढगाळ होते. तसेच आर्द्रतेची पातळी 77 ते 84 टक्क्यांच्या दरम्यान होती. संपूर्ण शहरात ताशी 11 ते 14 किमी प्रति तास वेगाने मध्यम वारे वाहत होते. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शहराच्या विविध भागांमध्ये नोंद झालेली एक्यूआयची पातळी चिंता वाढवत आहे. त्यात वांद्रे-कुर्ला संकुल येथे 156, भायखळा-149, अंधेरी पूर्व – 113, चेंबूर-180, कुलाबा-124, देवनार-131 आणि कांदिवली पश्चिम येथे 104 अंक इतक्या एक्यूआयची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Comments are closed.