शरीरसौष्ठवपटूंसाठी खानविलकरांचे लाखमोलाचे ‘क्रीडाकर्तव्य’, दुबई येथे होणाऱ्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत तीन मुंबईकर खेळाडूंचा पूर्ण खर्च उचलला

आगामी आशियाई स्पर्धेसाठी तीन मुंबईकरांचा पूर्ण खर्च उचलणार असल्याचे आश्वासन मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेदरम्यान बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिले होते. आपण जे बोलतो ते करून दाखवतो असा लौकिक असलेले दानशूर खानविलकर पुन्हा एकदा शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. येत्या 14 ते 18 जूनदरम्यान अजमन, दुबई येथे होत असलेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत हिंदुस्थानचे नेतृत्व करत असलेल्या 3 मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंचा पूर्ण खर्च उचलत खानविलकरांनी आपले अनोखे क्रीडाकर्तव्य बजावले.

सर्वसामान्यांचा आणि होतकरू मुलांचा खेळ असलेल्या शरीरसौष्ठवात मुंबईसारखी अफाट गुणवत्ता अवघ्या हिंदुस्थानात कुठेही नाही; पण जागतिक स्पर्धा म्हटली की आपले असंख्य खेळाडू प्रचंड खर्चाअभावी माघार घेतात आणि खरी गुणवत्ता मागेच राहते. या गुणवत्तेला पाठबळ देण्यासाठी, पुढे आणण्यासाठी अजय खानविलकरांनी ‘मुंबई श्री’ स्पर्धेदरम्यान तीन खेळाडूंना आर्थिक पाठबळ देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी शरीरसौष्ठवपटू हरमित सिंग, संदीप सावळे आणि महिला शरीरसौष्ठवपटू रेखा शिंदे या तिघांचा लाखमोलाचा पूर्ण खर्च उचलला आहे. यात विमान प्रवास, भोजन-निवास व्यवस्था आणि स्पर्धेची नोंदणी या सर्व गोष्टींचा समावेश आहे. खानविलकरांच्या दानशूरपणाचे अवघ्या क्रीडा जगतात काwतुक केले जात आहे. आशियाई स्पर्धेसाठी या तीन खेळाडूंसह ज्युनियर शरीरसौष्ठवपटू समर्थ कोचले आणि मास्टर्स शरीरसौष्ठवपटू मनोज बोचरेही सहभागी होणार आहेत.

मदत नव्हे, शरीरसौष्ठवाची परतफेड

खानविलकरांनी मुंबईपाठोपाठ राज्य संघटनेची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेकडो खेळाडूंना शरीराप्रमाणे आर्थिकदृष्टय़ा श्रीमंत करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यानुसार ते खेळाडूंच्या नोकरीसह त्यांना पुरस्कर्ते मिळवून देण्यालाही आपले कर्तव्य मानत आहेत. जे काही आयुष्यात कमावलेय ते फक्त आणि फक्त शरीरसौष्ठवामुळेच. त्यामुळे या खेळासाठी आम्ही काही करतोय ते उपकार नसून, आमचे क्रीडाकर्तव्य आहे. खेळाने आमच्यावर जी उधळण केलीय, त्याची ही आमच्याकडून परतफेड असल्याचेही खानविलकर म्हणाले. भविष्यातही या खेळासाठी हजार वेळा स्वतःच्या खिशात हात घालूच; पण समाजात असलेल्या दानशूरांच्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्याही खिशात हात घालून खेळ आणि खेळाडूंसाठी  उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Comments are closed.