अर्थविशेष – मुहूर्ताची खरेदी
>> अजय वाळिंबे
सोनेखरेदी हा आपला भावनिक गुंतवणूक असलेला विषय. त्यामुळे सणाची खरेदी, मुहूर्ताची खरेदी म्हणजे सोने हे अगदी आपल्या मनावर बिंबले आहे. शुभशकुनाची खरेदी म्हणजे सोने हे जरी खरे असले तरी बदलत्या काळानुसार यातही बदल होणे अपेक्षित आहे.
दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने सोनेखरेदी होत असली तरी यंदा सोनेखरेदी काहीशी अवघड ठरणारी वाटते. हौस म्हणून किंवा मुहूर्ताची खरेदी म्हणून ही खरेदी होईलही पण घसघशीत वाटावा असा सोन्याचा दागिना घेताना वाढलेले भाव डोळ्यासमोर येतात. दिवाळाच्या मुहूर्तावर शकुनाची खरेदी व्हावी असे तुम्हालाही वाटत असणार. मात्र यावर्षी तुम्हाला दिवाळी सणाची विशेष भेट आणि गुंतवणूक असे दोन्ही पर्याय साध्य करता येतील. असे पर्याय निवडले तर ते अधिक सयुक्तिक ठरू शकते.
- सॉवरेन गोल्ड बाँड (एसजीबी) : हा भारत सरकारकडून जारी केलेला सोन्यावर आधारित बाँड.
सोन्याच्या किमतीप्रमाणे मूल्यवाढ अधिक 2.5 टक्के वार्षिक व्याज.
भौतिक सोन्याची जोखीम (चोरी, शुद्धतेचा प्रश्न) नाही.
आठ वर्षांनंतर मॅच्युरिटी- भांडवली नफा करमुक्त.
खरेदी-पी शक्य. यातील जोखीम अशी की, बाजारभाव घटल्यास एसजीबीची किंमत कमी होऊ शकते. - गोल्ड ईटीएफ: हा शेअर बाजारात व्यापार होणारा सोन्याच्या किमतीशी जोडलेला फंड.
सोपी खरेदी-पी, डीमॅट स्वरूपात.
सोनं शुद्धतेची किंवा साठवणीची चिंता नाही.
लिक्विडिटी. बाजारातील किंमतीप्रमाणे याच्याही मूल्यात चढउतार होतात. - गोल्ड म्युच्युअल फंड : हा गोल्ड ईटीएफमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करणारा फंड.
यासाठी डीमॅट खात्याची आवश्यकता भासत नाही.
यात एसआयपीद्वारे थोडय़ाथोडय़ा रकमेने गुंतवणूक शक्य होते.
गोल्ड ईटीएफप्रमाणेच याच्या बाजारभावात चढउतार होऊ शकतात.
सिल्व्हर ईटीएफ हा चांदीवर आधारित ईटीएफ.
औद्योगिक वापरामुळे याची मागणी वाढण्याची शक्यता असते. ह सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सोन्यापेक्षा स्वस्त असते.
गेल्या तीन वर्षांत या ईटीफचा गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेला आहे.
मल्टी अॅसेट म्युचुअल फंड : ही संतुलित फंड योजना असून या योजनेत वेगवेगळ्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली जाते. उदा. इक्विटी, बाँड्स तसेच सोने, चांदी इ. पर्याय निवडले जातात. साहजिकच बाजाराच्या चढ-उताराचा कमी परिणाम होऊन हे फंड हे सुरक्षित तसेच उत्तम परतावा देऊ शकतात. म्युचुअल फंड असल्याने एसआयपीने गुंतवणूक शक्य आहे.
18 कॅरट सोनं : हा सध्याचा सगळ्यांचा आवडता पर्याय ठरत आहे. बहुतांशी लोक सोन्याचे दागिने करताना 22 कॅरटचा पर्याय निवडतात. परंतु त्या ऐवजी 18 कॅरटचे दागिने करून घेतल्यास ते स्वस्त तर पडतातच, पण त्याशिवाय ते टिकाऊदेखील असतात. या सोन्याचा वापर सामान्यत अंगठय़ा, हार आणि ब्रेसलेट यासारख्या दागिन्यांमध्ये केला जातो. टिकाऊपणा आणि शुद्धतेमधील परिपूर्ण संतुलनासाठी ते पसंत केले जाते, ज्यामुळे ते दररोज वापरण्यासाठी योग्य बनते.
इतके पर्याय समोर आले तरी सोने गुंतवणुकीची योग्य वेळ कुठली, हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1925 मध्ये 10 ग्रॅम सोने 18.75 रुपयांना मिळत होते. तर गेल्या दोन दशकातील सोन्याच्या भावाची चढती कमान पहिली तर सोन्यातील गुंतवणूक किती फायद्याची ठरू शकते याची कल्पना येईल. 2003 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 5600 रुपये होता तो सध्या 1,25,000 वर आहे. इतका उत्तम परतावा दुसऱया कुठल्याही गुंतवणुकीने दिला नसेल. मात्र इतक्या वेगात वाढलेले हे सोन्याचे दर या पुढेही असेच चढे राहतील का? हा खरा प्रश्न आहे. तज्ञांच्या मते सोन्यासारख्या अनमोल धातूमध्ये प्रत्येक मंदीत गुंतवणूक फायद्याची ठरते. सध्याची जागतिक अनिश्चित परिस्थिती, वाढते कर्ज, कच्च्या तेलाच्या किमती, घसरता रुपया, चलनांचे युद्ध आणि अवमूल्यन, चलनवाढ इ. पाहता शेअर बाजाराची परिस्थिती अशीच दोलायमान राहील, असा तज्ञांचा अंदाज आहे. सोन्याच्या भावातही चढ-उतार अटळच आहेत. मात्र तरीही सोन्या-चांदीतील गुंतवणूक शहाणपणाची ठरत आहे. सामान्य गुंतवणूकदाराला कमी धोका पत्करून सोन्या-चांदीत गुंतवणूक करायची असेल तर एसजीबी आणि ईटीएफ मधील एसआयपी दीर्घकालीन गुंतवणूक, सुरक्षित आणि फायद्याची ठरू शकेल. परिपूर्ण पोर्टफोलियोमध्ये सोन्याला किंवा आता चांदीलासुद्धा विसरून चालणार नाही हे मात्र नक्की.
सोन्याचा दागिना हा केवळ गुंतवणूक म्हणून नव्हे तर प्रेम, जिव्हाळा दर्शविण्यासाठी केला जातो. आपल्या सण, उत्सवांमध्ये सोन्याच्या दागिन्यांना, वस्तूंना विशेष महत्त्व आहे. आपली संस्कृती आणि संस्कार याचेही औचित्य यानिमित्ताने राखले जाते. त्यामुळे सणाची खरेदी, मुहूर्ताची खरेदी म्हणजे सोने हे अगदी आपल्या मनावर बिंबले आहे. शुभशकुनाची खरेदी प्रासादिक असावी, त्यातील आनंद, आपुलकी राखले जावे हे जरी खरे असले तरी बदलत्या काळानुसार यात बदल होणे अपेक्षित आहे. दिवाळी हा धनलक्ष्मीचा सण. सौख्य आणि संपन्नता लाभावी यासाठी प्रार्थना करताना नव्या पद्धतीने गुंतवणूक करीत सुबत्तेचे नवे मार्ग आजमावायला हवेत.
(लेखक अर्थतज्ञ आहेत.)
Comments are closed.