अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष, सलग दुसऱ्यांदा सांभाळणार एमसीएच्या प्रमुखपदाची सूत्रे, सात उमेदवारांची निवडणुकीतून माघार
नेहमीच प्रतिष्ठsची ठरणारी मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणूक यंदा बिनविरोध ठरली आहे. विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याविरुद्ध उभे असलेल्या सातही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे पुढील तीन वर्षांसाठी ते पुन्हा एकदा एमसीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळतील. बुधवारी एमसीएची त्रैवार्षिक निवडणूक रंगणार आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच एकही पॅनल उभे राहिले नसल्यामुळे पूर्ण निवडणुकीत गोंधळाचे वातावरण होते. त्यातच तीन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आज अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या हिंदुस्थानी महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडल्जी, शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, भाजप आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक, ‘एमसीए’चे माजी सहसचिव शाहआलम शेख आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य सूरज समत यांनी आपापले अर्ज मागे घेत अजिंक्य नाईक यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केला.
याचिकेवर आज निर्णय
एमसीएचे माजी संयुक्त सचिव शाहआलम शेख यांनी नाईक यांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर उद्या मंगळवारी निर्णय येणे अपेक्षित आहे.
सर्व पदांसाठी कडवी लढत
अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होत असली तरी अन्य सर्व पदांसाठी अटीतटीची थेट लढत रंगणार आहे. उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड हे नवीन शेट्टींशी भिडतील तर सचिवपदासाठी उन्मेश खानविलकरांची गाठ शाहआलम शेख यांच्याशी पडेल. संयुक्त सचिवपदासाठी नीलेश भोसले आणि गौरव पय्याडे यांच्यात लढत रंगणार असून अरमान मलिक पुन्हा एकदा कोषाध्यक्ष होण्यासाठी सुरेंद्र शेवाळेंविरुद्ध लढणार आहेत. त्याचप्रमाणे अॅपेक्स काwन्सिलच्या 13 जागांसाठी मिलिंद नार्वेकर, सूरज समत, मंगेश साटम, संदीप विचारे आणि प्रमोद यादव या विद्यमान सदस्यांसह नदीम मेमन, चिराग गोहिल, विघ्नेश कदम, चंद्रशेखर कांबळे, श्रीकांत कामतेकर, मौलिक मर्चंट, शफीक पटेल, भूषण पाटील, समीर पेठे, सुनील रामचंद्रन, विकास रेपाळे, नील सावंत, अरुण तावडे, सागर तिगडी हे तगडे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
तीन दशकांत प्रथमच बिनविरोध
एमसीएच्या निवडणुकीत अध्यक्षपदाची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठsची आणि अटीतटीची झाली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींपासून विलासराव देशमुखांपर्यंत सर्वांनाच चुरशीच्या लढतीनंतर अध्यक्षपदाच्या सिंहासनावर विराजमान होण्याचे भाग्य लाभले आहे. गत निवडणुकीतही अमोल काळे यांनी माजी कसोटीपटू संदीप पाटील यांचा 183 विरुद्ध 158 असा 25 मतांनी पराभव करत अध्यक्षपद जिंकले होते. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या निवडणुकीत सचिव असलेल्या अजिंक्य नाईक यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती.
Comments are closed.