क्रिकेट पुढे निघालं, पण निवड समिती अजून गोंधळलेली! रहाणेचा थेट इशारा; म्हणाला, बदल करायलाच हवा!

हिंदुस्थानचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आता निवड समितीवरच भिडला आहे. क्रिकेट झपाटयाने बदलतंय आणि निवड प्रक्रिया मात्र जुन्या वाटेवरच चालतेय, असं त्याचं स्पष्ट मत आहे. रहाणे म्हणाला, ‘खेळ बदलला, मानसिकता बदलली, मग निवड समितीचा विचार तसाच का?’

सध्या नियम असा की, किमान 10 प्रथम श्रेणी सामने खेळलेला आणि पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालेला खेळाडू राज्य निवड समितीत बसू शकतो. पण रहाणे म्हणाला, असं झालं तर निवड समिती जुन्या पद्धतीतच अडकून राहते. आपल्याला असे लोक हवेत जे अलीकडेपर्यंत क्रिकेट खेळले आहेत, ज्यांना आजचं क्रिकेट काय मागतंय हे समजतं.

तो पुढे म्हणाला, खेळाडूंनी निवड समितीपासून घाबरायचं नाही. आपल्याला असे निवडकर्ते हवेत जे गेल्या 5-8 वर्षांत टॉप लेव्हलवर खेळले आहेत. क्रिकेट आता 20-30 वर्षांपूर्वीचं राहिलेलं नाही. आपण अजूनही त्याच जुन्या मानसिकतेने निर्णय घेतोय, हे बरोबर नाही.

रहाणेने ही मते चेतेश्वर पुजाराच्या ‘यूटय़ूब’ चॅनेलवर बोलताना व्यक्त केली. रहाणे म्हणाला, टी-20 आणि आयपीएलमुळे खेळाचं रूपच बदललं आहे. निवड समितीने हा बदल ओळखायलाच हवा. खेळाडूंना बांधून न ठेवता मुक्तपणे खेळू द्यावं. आजचे क्रिकेटर  बेधडक आहेत, त्यांना तसेच खेळू द्यायला हवे.

रहाणेचे करियरही बोलके आहे-  85 कसोटींमध्ये 5077 धावा, 12 शतकं आणि 26 अर्धशतकं. त्याच्याच कर्णधारपदाखाली हिंदुस्थानने 2020-21 च्या बॉर्डर-गावसकर मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Comments are closed.