संजू सॅमसनबाबत अजिंक्य रहाणेचं मोठं विधान; वर्ल्ड कपआधी संघ व्यवस्थापनाला दिला ‘हा’ सल्ला
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेत सलामीच्या फलंदाजांचा संघर्ष सुरू असतानाही, भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने टीम मॅनेजमेंटला संजू सॅमसनला पाठिंबा देत राहण्याची विनंती केली आहे. 2026 चा टी20 विश्वचषक जवळ येत असताना रहाणेने हे विधान केले आहे. रहाणेच्या मते, हा असा टप्पा आहे जिथे नेतृत्व गटाचा (Leadership Group) विश्वास आणि स्पष्टता सॅमसनला त्याचा सर्वोत्तम फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी मदत करू शकते.
गुवाहाटी टी20 मध्ये सॅमसन शून्यावर बाद झाला आणि त्याचा खराब फॉर्म कायम राहिला. यामुळे 2026 मधील आतापर्यंतच्या 16 सामन्यांपैकी 3 सामन्यांत त्याने केवळ 18 रन्स केले आहेत, जे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने चिंतेचे कारण आहे. क्रिकबझशी बोलताना रहाणे म्हणाला की, मॅनेजमेंट आणि कर्णधार सूर्यकुमार यादव सॅमसनला साथ देण्याची शक्यता आहे. कठीण काळात दर्जेदार खेळाडूंना पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला, “एक फलंदाज म्हणून मला या फॉरमॅटमध्ये असे जाणवले आहे की, कधीकधी बाद होताना तुम्ही खूप खराब दिसता आणि ते ठीक आहे. हे सर्व विश्वासावर अवलंबून असते. मैदानात जाऊन पूर्ण स्वातंत्र्याने खेळणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.”
अजिंक्य रहाणेने हे देखील स्पष्ट केले की, संजू सॅमसनला फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माची नक्कल करण्याची गरज नाही. अभिषेकने या मालिकेत टॉप ऑर्डरमध्ये जबरदस्त कामगिरी केली असून केवळ 14 चेंडूत अर्धशतक ठोकून भारताला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला आणि मालिका खिशात घातली. रहाणेच्या म्हणण्यानुसार, सॅमसनने कोणाचेही अनुकरण न करता आपला नैसर्गिक खेळ (Natural Game) खेळायला हवा.
Comments are closed.