अजिंक्य रहाणेचा ठाम दावा: ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला माझी गरज होती!

भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रणजी ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना त्यानं छत्तीसगडविरुद्ध बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकॅडमीवर 159 धावांची झळाळती खेळी केली. या खेळीने रहाणेनं पुन्हा सिद्ध केलं की वय फक्त एक आकडा आहे. अनुभव आणि जिद्द हाच खरा फरक घडवतो.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना रहाणेनं स्पष्ट सांगितलं की, “हा वयाचा नव्हे, तर इंटेंटचा मुद्दा आहे. रेड बॉल क्रिकेटमध्ये आवड आणि कठोर मेहनतच खेळाडूला पुढे नेत असते.”

रहाणेनं ऑस्ट्रेलियाच्या माईक हस्सीचं उदाहरण देत सांगितलं, “हस्सीनं 30 व्या वर्षी कसोटीत पदार्पण केलं, पण तरीही तो सातत्याने धावा करत राहिला. अनुभव रेड बॉल क्रिकेटमध्ये सोन्यासारखा असतो.” त्याचबरोबर रहाणे म्हणाला, “माझ्या मते बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाला माझी गरज होती. मी तयारही होतो.”

रहाणेनं पुढं सांगितलं, “34-35 वर्षांनंतर खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करतात. जर एखादा खेळाडू रेड बॉल क्रिकेटबद्दल पॅशिनेट असेल, तर निवड समितीनं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. केवळ धावांकडे नाही, तर इंटेंट, पॅशन आणि खेळाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाकडे पाहावं.”

रहाणेनं रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा उल्लेख करत म्हटलं, “जेव्हा तुमच्याकडे रोहित आणि विराटसारखे अनुभवी खेळाडू असतात, तेव्हा संघाला स्थैर्य मिळतं. तरुण खेळाडूंचं योगदान महत्त्वाचं असतं, पण कसोटी क्रिकेटसाठी अनुभव अनिवार्य आहे.”

अजिंक्य रहाणेनं मुंबईसाठी खेळताना आपलं 42वं प्रथमश्रेणी शतक झळकावलं आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं की अजिंक्य रहाणे अजूनही संपलेला नाही.

Comments are closed.