आगरकरलाही 2027 च्या वर्ल्ड कपचे वेध, निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी बीसीसीआयकडे फिल्डिंग
हिंदुस्थानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद जिंकून देण्यासाठी संघ निवड करणाऱ्या अजित आगरकरने आता जगज्जेतेपदाची हॅटट्रिक करायची आहे. यासाठी 2027 मध्ये होणाऱया आयसीसी वर्ल्ड कपपर्यंत हिंदुस्थानी संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम राहायचे आहे. यासाठी त्याने आतापासूनच बीसीसीआयकडे फिल्डिंग लावली असून आपल्या पदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे बीसीसीआय आगरकरची इच्छापूर्ती करते की नव्या बॉसची निवड करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवा संघ, जुनाच अध्यक्ष
2027 वर्ल्ड कपच्या नव्या चक्रात हिंदुस्थानला नव्याने संघ उभा करायचा आहे. संघात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे नव्या खेळाडूंवर संघाची जबाबदारी टाकली जाणार आहे. अशा वेळी निवड समितीत सातत्य ठेवणे फायदेशीर ठरू शकते. अलीकडील आयसीसी स्पर्धांतील यशामुळे आगरकरचा दावा अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे नव्या संघाची पायाभरणी करायची असली तरी त्यासाठी जुन्या अध्यक्षालाच प्राधान्य देण्याची शक्यता अधिक आहे.
बीसीसीआयची प्रतीक्षा कायम
बोर्डात या मुद्दय़ावर चर्चा सुरू असली तरी अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. अगरकरला कायम ठेवायचे की नव्या चेहऱयासोबत सुरुवात करायची, हा बीसीसीआयमोरील मोठा पेच आहे.
यशाची मजबूत पार्श्वभूमी
जून 2023 पासून आगरकरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024,
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकले. 2023 वन डे वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरी आणि आशिया कप विजयही त्यांच्या खात्यात जमा आहेत.
संक्रमणाची खरी कसोटी
रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारखे दिग्गज टी 20-कसोटी क्रिकेटपासून दूर, तर अश्विन निवृत्त अशा परिस्थितीत नव्या खेळाडूंना तयार करणे आणि संघाचा समतोल राखणे ही आगरकरसमोरील सर्वात मोठी परीक्षा आहे.
2027 साठी आतापासून तयारी
आगरकरने आधीच संकेत दिले आहेत. 2027 वर्ल्ड कपसाठी टीम कॉम्बिनेशनवर काम सुरू आहे. पुढील काळात संघाचे रूप पूर्ण बदलू शकते आणि त्यासाठी निवड समिती सज्ज ठेवणे हीच खरी रणनीती आहे.
Comments are closed.