मोहम्मद शमीचा सवाल! रणजीसाठी फिट, मग वनडेसाठी का नाही? आगरकरचं थेट उत्तर, म्हणाले …

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला उद्या म्हणजेच 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, अनुभवी मोहम्मद शमीला या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. त्याच्या फिटनेसबाबतच्या कारणामुळे निवड समितीनं त्याचं नाव वगळल्याचं जाहीर केलं होतं.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मोहम्मद शमीने थेट निवडकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली. त्याने सांगितलं की, तो रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळण्यासाठी उपलब्ध आहे, म्हणजेच तो फिट आहे. “जर मी रणजीसाठी फिट आहे, तर वनडे मालिकेसाठी का नाही? हे निवड समितीला कळवणं माझं काम नाही,” असं शमीने म्हटलं होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं.

दिल्लीतील एका कार्यक्रमात निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांना यासंदर्भात विचारण्यात आलं असता, त्यांनी संयमी आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “शमी हा भारतासाठी अविश्वसनीय कामगिरी करणारा गोलंदाज आहे. जर त्याने काही म्हटलं असेल, तर त्याच्याशी थेट संवाद साधणं योग्य ठरेल. इंग्लंड दौऱ्याच्या आधीच स्पष्ट केलं होतं की, तो फिट असेल तर त्याला संधी मिळेल. दुर्दैवाने त्यावेळी तो फिट नव्हता,” असं आगरकर म्हणाले.

तसेच, अजित आगरकर यांनी रणजी ट्रॉफीच्या संदर्भातही मत व्यक्त करताना सांगितलं, “सध्या रणजी ट्रॉफीची पहिली फेरी सुरु आहे. आम्ही अजून काही सामने पाहणार आहोत. त्यातूनच स्पष्ट होईल की शमी पूर्णपणे फिट आहे की नाही. जर तो पूर्ण क्षमतेने चांगली गोलंदाजी करत असेल, तर शमीसारखा खेळाडू कोणाला नको असेल?”

मोहम्मद शमीने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतासाठी दमदार कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या सर्जरीनंतर तो संघातून बाहेर आहे. आता तो हळूहळू पुनरागमनाच्या तयारीत आहे. रणजी ट्रॉफीत त्याची कामगिरी कशी राहते, यावर त्याच्या आगामी निवडीचं भविष्य अवलंबून असेल.

Comments are closed.