एकत्र आलो तरी निवडणुकीत घड्याळच बांधा! अजित पवार गटाचा आग्रह

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तरी एकाच चिन्हावर सर्व उमेदवारांनी निवडणूक लढवावी असा आग्रह अजित पवार गटाने धरला आहे. शरद पवार गटाच्या उमेदवारांनी देखील घडय़ाळावर निवडणूक लढवावी यासाठी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांना गळ घातली जात आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घडय़ाळ किंवा तुतारी यापैकी एकच चिन्ह असावे असा आग्रह धरला आहे. ते म्हणाले, दोन्ही गटांकडून एकत्र निवडणूक लढवताना घडय़ाळ किंवा तुतारी या दोन्हीपैकी एकच चिन्ह उमेदवारांनी घ्यावे. दोन चिन्ह असल्यास ग्रामीण भागात मतदारांचा गोंधळ उडेल हे माझे वैयक्तिक मत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठय़ा प्रमाणात आउटगोइंग झाले. याकडे लक्ष वेधले असता भरणे म्हणाले, या निवडणुकीमध्ये आम्ही आउटगोइंग रोखू. महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी एका चिन्हावर निवडणूक लढवावी. महापालिका निवडणुकीमध्ये दोन चिन्ह असल्याने त्याचा फटका बसल्याचे म्हटले. आज दोन्ही गटांच्या उमेदवारांनी घडय़ाळ चिन्हावरच निवडणूक लढवावी, असा त्यांच्या नेत्यांचा आग्रह आहे.

शरद पवार गटाकडून मात्र या भूमिकेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हे स्वतंत्र पक्ष आहेत. याशिवाय चिन्हाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. असे असताना एका चिन्हाबद्दल आग्रह धरणे उचित होणार नाही, असे मत शरद पवार गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे.

Comments are closed.