Ajit pawar give advice party leaders and minister dont put politics workers be self reliant after munde resign


मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून गेले काही महिने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा सहभाग निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. यानंतर मंगळवारी ( 4 फेब्रुवारी ) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजितदादा पवार ) बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

“पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको. परावलंबी न होता स्वावलंबी व्हा,” असा सल्ला अजितदादांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावरून नेत्यांना दिला आहे. धनंजय मुंडे हे पूर्णपणे वाल्मिक कराड याच्यावर निर्भर होते. एकप्रकारे ‘प्रतिसरकार’ वाल्मिक कराड हा चालवत असे. कराडशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नसे. आता कराडमुळे अडचणीत आलेल्या मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे अजितदादांनी केलेले हे विधान चर्चेत आले आहे.

बैठकीत अजितदादा काय म्हणाले?

“कोणत्याही नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणे किंवा आंधळेपणाने विश्वास टाकू नये. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. नेत्यासोबत कार्यकर्ते व्यवस्थित नसतील, तर त्याची झळ नेत्यासोबत पक्षाला देखील कशाप्रकारे बसते, हे धनंजय मुंडेंच्या प्रकरणातून आपल्याला दिसून आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या आजूबाजूला कोणते कार्यकर्ते आहेत, याची माहिती घ्या. पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको. परावलंबी न होता स्वावलंबी व्हा,” असे अजितदादांनी नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांचा दम अन् मुंडेंचा राजीनामा…

मुख्यमंत्री फडणवीस हे पहिल्यापासून मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. पण, मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी समजून सांगितले होते. पण, मुंडे ऐकण्यास तयार नव्हते. संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल होऊ लागले आणि त्यावर राग अन् रोष व्यक्त होऊ लागला. त्यानंतर, ‘तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे लागले,’ असा दम मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना भरला. मग मुंडेंना राजीनामा देण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.



Source link

Comments are closed.