अर्थखाते अद्याप न मिळाल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सूर
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले, पण अजितदादांकडे असलेले अर्थखाते अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिले गेलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत अर्थखाते अद्याप राष्ट्रवादीकडे आलेले नाही याबद्दल नाराजी व्यक्त झाली. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्याकडील अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. या वर्षीचा अर्थसंकल्पही त्यांनी अधिवेशनात मांडला होता. मात्र दादांच्या निधनाला दोन महिने उलटल्यानंतरही महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या कोटय़ात असलेले अर्थखाते अद्याप राष्ट्रवादीकडे आलेले नाही. यामुळेच राष्ट्रवादीमध्ये खदखद व्यक्त होत आहे.
अर्थखाते मिळाल्यास कोणाला देणार?
राष्ट्रवादीला अर्थखाते मिळाले तर ते कोणाकडे सोपवले जाणार याबद्दलही चर्चा रंगली आहे. अर्थखात्यासारखी महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ज्येष्ठ सदस्याला प्राधान्य दिले जाते. परंतु सध्या राष्ट्रवादीमध्ये हे खाते सक्षमपणे सांभाळू शकेल असा नेता नसल्याचेही बोलले जात आहे.
Comments are closed.