जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन टप्प्यात? अजित पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल लागेल. या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उठलेला असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचेही इच्छुकांना वेध लागले आहेत. याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे.
कोरेगाव भीमा येथे अभिवादन विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर भाष्य केले. आधी नगरपालिका निवडणुका झाल्या आणि आता महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, असे अजित पवार म्हणाले.
जिल्हा परिषदांसाठी आचारसंहिता नेमकी कधी लागणार असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, ते मला माहिती नाही. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबद्दलचा निर्णय घेईल. परंतु मागे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, 31 जानेवारीच्या आत सगळे संपवायचे. नंतर न्यायालयानेच सांगितले की, 50 टक्क्यांवर आरक्षण जाता कामा नये.
अजित पवार गटाची शरद पवार गटावर कुरघोडी, 18 जागा ठरलेल्या असताना 4 जागांवर बोळवण
परंतु मोठ्या प्रमाणात विशेषत: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण गेले आहे. ते आरक्षण 50 टक्क्यांपर्यंत करायच्या सूचना न्यायालयाच्या आहेत. आता निवडणूक आयोग ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे, तिथे आधी निवडणुका घेईल आणि बाकी ठिकाणी आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आल्यावर निवडणुका होतील. म्हणजे दोन टप्प्यात निवडणुका होतील असा अंदाज आहे, असे अजित पवार म्हणाले.

Comments are closed.