अजित पवारांनी राजीनामा द्यावा, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा! जमीन घोटाळा प्रकरणी विरोधक आक्रमक

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली. त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

एखादे प्रकरण झालं, ते अंगलट आले की उपमुख्यमंत्री अजित पवार हात झटकतात. आता तर पुण्यातील जमिनीचे प्रकरण आहे. त्यांच्या मुलाने व्यवहार केला आहे. प्रकरण वाढल्यावर माझा याच्याशी संबंध नाही असे बोलून उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदारी झटकू शकत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीने व्यवहार केला. या कंपनीत पार्थ पवार पार्टनर आहेत. त्यांच्या सह्या आहेत, मग गुन्हा फक्त दिग्विजय पाटील वर का दाखल झाला? महायुती सरकार म्हणजे तू खा, मी ही खातो आणि एकमेकांना वाचवू असे संगनमताने काम सुरू आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

पुणे जमीन घोटाळा प्रकरणी आता सांगण्यात येत आहे की दिग्विजय पाटील याला व्यवहार करण्यासाठी अधिकार देण्यात आले होते. पण व्यवहार करायला पैसे आले कुठून? व्यवहार कुणामुळे झाला? कुणामुळे स्टॅम्प ड्युटी माफ झाली? पार्थ पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली पाहिजे या प्रकरणाशी सबंधित महसूल विभागाचे अधिकारी, उद्योग संचानालय, शीतल तेजवानी सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार काल म्हणाले, तीन महिन्यापूर्वी कानावर आले. चुकीच्या गोष्टी मला चालणार नाही असे सांगितलं होते. मग तेव्हाच पार्थ पवार यांना अजित पवार यांनी का थांबवले नाही? घरात हा व्यवहार होतो हे माहीत होते तेव्हाच थांबवले असते तर हा घोटाळा घडला नसता अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. कुणाबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात पण म्हणून त्यांच्या जीवावर उठणे हे महाराष्ट्रात शोभत नाही त्यामुळे जरांगे पाटील यांना अधिकचे पोलीस संरक्षण देण्यात यावे असे वडेट्टीवार म्हणाले.

मुलगा व्यवहार करतो, पित्याला ज्ञात नाही

मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केली. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Comments are closed.