‘ते’ वाईट स्वप्न असावे असे आजही वाटते; अजितदादांच्या अकाली एक्झिटला महिना पूर्ण; रोहित पवारांचे भावनिक ट्विट!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटला आज एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास अजित पवार यांचे विमान बारामतीमध्ये कोसळल्याचे वृत्त धडकले आणि अवघा महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला. त्या काळ्या दिवसाच्या आठवणीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांचे डोळे पाणावले आहेत. ‘ते’ वाईट स्वप्न असावे असे आजही वाटते, असे ट्विट रोहित पवार यांनी एक्सवर केले आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. लँड करत असताना तांत्रिक बिघाड झाला आणि चार्टर्ड विमान कोसळले. अपघातानंतर भीषण स्फोट झाले आणि अजित पवारांसह एकूण 5 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. मात्र अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात यावरून संशय व्यक्त केला जात आहे. रोहित पवार सातत्याने पत्रकार परिषद घेत पुराव्यांसह यावर बोलत असून पारदर्शक चौकशीची मागणीही करत आहेत. सोमवारीही ते महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे.

दरम्यान, विमान अपघात झाल्याचे वृत्त कळताच रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी अजित पवारांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर 8 वाजून 56 मिनिटांनी फोन केला होता. पण तो कॉल उचलला गेला नाही. याचाच स्क्रिनशॉट शेअर करत रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित पवारांचे ट्विट

जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही, खूप वेदनादायी..! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Comments are closed.