‘रमीपटू’ कोकाट्यांचा आज फैसला, अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

शेतकरी त्रस्त असताना विधान परिषदेच्या सभागृहात जंगली रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मुंबईत बोलावून घेतले होते. पण अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासोबतची आजची बैठक रद्द केली. आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याबाबत चर्चा करणार आहेत.

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दबाव वाढला आहे. मंत्रिपद वाचावे यासाठी कोकाटे यांनी नंदुरबारमधील शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनिवारी पूजा केली. कोकाटे नंदुरबारमध्ये असतानाच अजित पवारांनी त्यांना मुंबईला तातडीने बोलावून घेतले. सोमवारी या दोघांमध्ये बैठक होणार होती. मात्र ही बैठक होऊ शकली नाही. आता अजित पवारांनी पक्षातील मंत्री, आमदारांची मंगळवारी बैठक बोलावली आहे. तेथेच अजित पवार पक्षातील काही नेत्यांची कानउघाडणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही माणिकराव कोकाटेंबाबत उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आम्ही काय निर्णय घ्यावा हा आमचा आणि मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पत्रकारांनी यामध्ये लुडबूड करू नये, अशा शब्दांत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.

शेतकऱयांप्रती असंवेदनशील असलेले माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माणिकराव कोकाटेंच्या कृतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पण तरीही अजित पवार यांच्या आजच्या वक्तव्यावरून माणिकराव कोकाटे यांना अभय मिळणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष

आमच्या काही मंत्र्यांच्या जरूर चुका झाल्या आहेत. पण विरोधक सरकारविरोधात नॅरेटिव्ह सेट करू पाहतात, ते होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोकाटेंच्या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.