Ajit Pawar’s clarification in the MLA meeting regarding the merger of Sharad Pawar group with NCP
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपण जावे, असा मतप्रवाह पक्षात एका बाजूचा असल्याची कबुली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे लवकरच विलिनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (14 मे) या चर्चेला पूर्णविराम दिला.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपण जावे, असा मतप्रवाह पक्षात एका बाजूचा असल्याची कबुली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे लवकरच विलिनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (14 मे) या चर्चेला पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत केल्याचे समजते. (Ajit Pawar’s clarification in the MLA meeting regarding the merger of Sharad Pawar group with NCP)
अजित पवार दर आठवड्याला मंगळवारच्या दिवशी पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतात. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांनी आज आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिका दिलेल्या मुलाखतीची चर्चा झाली. येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या 26 व्या वर्धापनदिनी विलिनीकरणाबाबत घोषणा होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा – Devendra Fadnavis : पाकिस्तानने भारतापुढे गुडघे टेकले आणि शस्त्रसंधी झाली; फडणवीसांकडून भारतीय सेनेचं कौतुक
आजच्या बैठकीत काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच अजित पवारांचे नेतृत्व मान्य असेल तरच विलिनीकरण करावे. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात हस्तक्षेप करू नये. अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना विलिनीकरणात सामावून घेऊ नये, अशीही मागणी काही आमदारांनी या बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. एकत्र येण्याबाबत कुणीही कोणताच प्रस्ताव मांडलेला नाही. त्यामुळे चर्चा होण्याचा सध्या तरी विषय नाही, असे सांगत अजित पवारांनी ही चर्चा थांबवली.
शरद पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटासोबत जाण्याबाबत आपल्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. आपण पुन्हा एकत्र यावे, असा एक मतप्रवाह आहे. तर भाजपशी आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातमिळवणी करू नये. इंडिया आघाडीसोबत राहूनच ही आघाडी पुन्हा संघटित करावी, असा दुसरा मतप्रवाह पक्षात असल्याची माहिती शरद पवार यांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. पक्षातील एक गट अजित पवार यांच्यासोबत जाण्यास इच्छुक असल्याची कबुली खुद्द पवार यांनी दिल्याने राष्ट्रवादीच्या वर्तुळात दोन्ही गटाच्या मनोमीलनाची चर्चा रंगली होती.
हेही वाचा – Bacchu Kadu : काका-पुतणे आधीपासून एकत्र, माझ्याकडे अनेक पुरावे; बच्चू कडूंच्या दाव्याने खळबळ
Comments are closed.