Ajit Pawar’s reaction on Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together
सध्या राज्याच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे. यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
मुंबई : मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद आणि भांडणं किरकोळ आहेत. त्यामुळे या गोष्टी बाजूला ठेवल्या तर एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार कठीण नाही, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीचे संकेत दिले. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपण किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचे म्हटले. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे. यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. (Ajit Pawar’s reaction on Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together)
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वत: काम करतात. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही यावं? याबाबत आम्ही म्हणजेच दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाने सांगण्याचं काही कारण नाही. माझं मत एवढंच आहे की, प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून त्यांना जे जे योग्य वाटतं तो निर्णय त्यांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
हेही वाचा – Sanjay Raut : राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा…; दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर काय म्हणाले राऊत?
रोहित पवारांची अजितदादांना साद
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवेळी रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर ही गोष्ट मराठी मनासाठी सुवर्णक्षण असेल. परंतु केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या विनंतीवर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – MNS : ठाकरे गट आता पवार गट आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत, अशा पक्षावर…; काय म्हणाला मनसे नेता?
Comments are closed.