बेडरुममधून धूर निघत होता, मुलाला वाचवण्यासाठी वडील धावले; आगीत होरपळून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

अकोल्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आगीतून मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांसह मुलाचाही होरपळून मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील मुंडगाव येथे घडली. सचिन ठाकरे आणि स्वराज ठाकरे अशी मयत बापलेकाची नावं आहेत. या घटनेमुळे ठाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सचिन ठाकरे यांच्या घरातील बेडरुममध्ये रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. याच बेडरुममध्ये त्यांचा 8 वर्षांचा मुलगा स्वराज झोपला होता. बेडरुममधून धूर निघत असल्याचे दिसताच सचिन यांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र मुलाला वाचवताना सचिन हे देखील गंभीररीत्या भाजले.

आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनीही धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र बापलेक होरपळले होते. त्यांना अकोला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आगीत घरातील सर्व सामान, दागिने, रोकड जळून खाक झाले. या घटनेची अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.