भाषेच्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित; अकोले तालुक्यात पुरवठा विभागाबद्दल संताप व्यक्त
तालुक्यातील लाभार्थ्यांना रेशन कार्डवरील धान्य मिळवण्यासाठी मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रेशन धान्यदुकानातील सावळागोंधळा वारंवार पुढे येतच आहे. त्यातच आता मराठी नाव टाइप केल्यानंतर मराठी पावती मिळत नाही. मराठी-इंग्रजी भाषांच्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याने पुरवठा विभागाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
गेली अनेक वर्षे रेशन स्वस्त धान्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पुढे येतच असतो. यामध्ये रेशनची नावे कमी करणे, नाव वाढविणे, रेशन कार्ड नावावर करून घेणे, ऑनलाइन पत्ता बदलणे, बाराअंकी कोड मिळविणे, केवायसी करून घेणे, तसेच अनेक वेळा चकरा मारूनही कामच होत नसल्याने या योजनेपासून अनेक नागरिक वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.
अकोले तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्थेमध्ये मराठी-इंग्रजी नावांचा सावळागोंधळ निर्माण झाला असल्याने अनेक लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ‘ई-पॉस’ मशीनमध्ये मराठी-इंग्रजी भाषांची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. जी नावे मराठीमध्ये येतात, त्यांना धान्यच वाटप करता येत नाही. तसेच केवायसी करता येत नसल्याने लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. या कारणामुळे अनेक लाभार्थ्यांना धान्यच मिळालेले नाही. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पुरवठा विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
ज्या ठिकाणी अडचणी येतात, तेथील नागरिकांनी लेखी तक्रार दाखल कराव्यात. तसेच तहसील कार्यालयात संपर्क साधून आपले म्हणणे मांडावे, जेणेकरून समस्येचे निराकरण करता येईल.
– डॉ. सिद्धार्थ मोरे, तहसीलदार, अकोले
शहरातील काही भागांतील नागरिकांनी पुरवठा विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. अनेकांनी या समस्येबाबत प्रत्यक्ष संपर्क साधला होता. मराठी पावती निघत नसल्याने धान्य वितरण करण्यास अडचणी येत होत्या. याबाबत लक्ष घालून समस्येचे तत्काळ निराकरण झाले असून, नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या.
-संदीप निळे, निरीक्षक, पुरवठा विभाग
Comments are closed.