ऐकावे जनांचे… – हा किडा चावला पाहिजे…
>> अक्षय मोटेगावकर
[email protected]
माहिती आणि रंजन यांचा मिलाफ साधणारे ‘वैचारिक किडा’ हे यूटय़ूब चॅनेल समाजमाध्यमांवर चांगलेच लोकप्रिय आहे. इतिहास, भाषा, विज्ञान, निसर्ग असे कोणताच विषय वर्ज्य नसलेले हे पॉडकास्ट ऐकलेच पाहिजेत या यादीत येतात.
ऐकण्याच्या या प्रवासात मला खूप काही अद्भुत गोष्टी मिळत गेल्या. कासवासंदर्भात संशोधनात्मक माहिती सांगणारे पॉडकास्ट… सापांच्या माहीत नसलेल्या गोष्टींवरील पॉडकास्ट… अशा वेगळ्या विषयांवरचे तज्ञ मंडळींचे पॉडकास्ट मराठी भाषेत आहेत म्हटल्यावर निश्चितच आश्चर्य वाटते. ‘वैचारिक किडा’ या यूटय़ूब चॅनेलच्या पॉडकास्टमध्ये असे वेगळे विषय अत्यंत जबाबदारीने हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजमाध्यमांमुळे आपण अनेक चांगल्या मंडळींसह जोडले जातो, हा महत्त्वाचा फायदा. असेच फेसबुकद्वारे ओळख झालेले इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर व कौस्तुभ कस्तुरे यांचे वैचारिक किडाच्या यूटय़ूब चॅनलवरील पॉडकास्ट ऐकण्यासारखे आहेत. गुरुप्रसाद कानिटकर यांनी औरंगजेबाची माहीत नसलेली बाजू फार रंजक पद्धतीने मांडली आहे. औरंगजेबाचे टोमणे, त्याचे दरबारी, मंत्री, त्यांचे वेगवेगळे किस्से, मुघल वंशावळ व त्यांची कार्यपद्धती, कुतूब शाहीच्या गोष्टी, औरंगजेबाविरुद्धच्या बंडाळी, औरंगजेबाचे वंशज यांचे किस्से असं बरंच काही सांगितले आहे. तसेच मराठय़ांच्या अज्ञात इतिहासावरही त्यांनी सप्रमाण भाष्य केले आहे. हिंदू राजे असूनही ‘शहाजी’ हे नाव कसे आले, शहाजी महाराजांच्या बखरींमधील कहाण्या, शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, राज्याभिषेकाच्या कहाण्या, रामचंद्र पंत अमात्य यांची कथा, बखरींमधून उलगडलेले संभाजी महाराज असा मोठा पट ते मांडतात.
कौस्तुभ कस्तुरे यांचे पॉडकास्ट पण छान झाले आहेत. बाजीराव पेशवे कोण होते, पेशवा हे पद कसे अस्तित्वात आले. बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व आणि पराक्रम, त्यांचया काळातील अर्थव्यवस्था, कृषी व्यवस्था, बाजीरावांचे हेरखाते याबाबतची माहिती अत्यंत रंजक पद्धतीने सांगितली आहे, तर दुसऱया पॉडकास्टमध्ये त्यांनी बाजीराव आणि मस्तानीचे खरे नाते कसे होते, काशीबाई आणि मस्तानीचे खरे नाते कसे होते, चित्रपटातील मांडणीतील खरे-खोटे, शनिवारवाडय़ाचे सत्य काय? बाजीराव पेशव्यांच्या युद्धकथा वगैरे कित्येक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. तसेच बाजीराव पेशव्यांचा अभ्यास करायचा असेल तर कोणती पुस्तके वाचली पाहिजेत, कसा अभ्यास केला पाहिजे हेदेखील सांगितले आहे.
रोहन अंबिके यांचा टिपू सुलतानवरील पॉडकास्ट ढण्यासारखा आहे. टिपू सुलतान हा खरंच स्वातंत्र्यसेनानी होता का? मैसूरच्या वाघाचा संदर्भ, त्याने खरंच मंदिरे बांधली का? नाना फडणवीस आणि टिपू सुलतान यांचे संबंध कसे होते? यावर खूप काही ऐकायला मिळेल.
पुरातत्त्व संशोधक ऋत्विज आपटे यांचा कातळशिल्प व कोकणचा इतिहास आणि रोहित पवार यांचा युरोपीय इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे हे सांगणारे पॉडकास्ट पण श्रवणीय झाले आहेत. या पॉडकास्टमधील ऐतिहासिक गप्पा हा भाग ऐकण्यासारखा आहे.
सुरुवातीला उल्लेख केला तसे मोहन उपाध्ये यांचा कासवांचा माहिती सांगणारा व सुधीर सावंत यांचा बरोबरचा सापांवरील पॉडकास्ट आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातात. महाभारत आणि रामायण यांचे अभ्यासक नीलेश ओक यांच्यासोबत रामायण व महाभारत यांच्यामधले किस्से, न माहीत असलेली तथ्ये हे ऐकताना आपल्याला विस्मयचकित झाल्याची भावना येते. पुष्पक विमान खरंच होते का? ब्रह्मास्त्रासारखी काही गोष्ट खरंच होती का? हे सगळे ऐकताना आपल्या प्रचलित गोष्टींमध्येच किती भ्रम आहे आणि तो दूर करण्यासाठी किती मोठय़ा प्रमाणात जागृतीची गरज आहे हे वारंवार जाणवत राहते.
प्रख्यात संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासोबतचा ‘मराठी खरंच इतकी अवघड आहे का’ हा पॉडकास्ट पण चांगला जमून आला आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी अत्यंत संयतपणे पण प्रखर अशी मते मांडली आहेत. याचबरोबर अध्यात्माची आवड असणाऱया मंडळींसाठी चमत्कार बाजूला सारून संतांचे श्रेष्ठत्व मांडणारे काही पॉडकास्टस् आहेत. डॉ. मेधा मेहेंदळेंचा आरोग्यविषयक पॉडकास्ट जरूर ऐकावा असा आहे.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)
Comments are closed.