ऐकावे जनांचे… – टेड टॉक्समधील चकाकता हिरा

>> अक्षय मोटेगावकर

सायमन सिनेक हा लेखक व प्रेरणादायी व्याख्याता. त्याची `TED Talks’ व त्याच्या यूटय़ूब चॅनेलवरील व्याख्याने यशाचा मूलमंत्र देतातच, सोबत तुम्ही ‘काय’ करता आणि ‘कसे’ करता यापेक्षा तुम्ही ते ‘का’ करता याचाही शोध घ्यायला लावतात.

अमेरिकेच्या वास्तुविशारद आणि रेखाचित्रकार रिचर्ड वुर्मन व ब्रिटिश अमेरिकन प्रसारण संरचनाकार हॅरी मार्क्स या दोघांनी तंत्रज्ञान (Technology), मनोरंजन (Entertainment) आणि रचनाशास्त्र (Design) यांच्यातील नवनवीन संकल्पनांच्या प्रसारासाठी `TED Conference’ किंवा ‘टेड टॉक्स’ ही शृंखला 1984 मध्ये सुरू केली. जगभरातील अनेक तज्ञ तिथे भाषणं देतात. `TED Talks’ ऐकत असताना शोध लागला सायमन सिनेकचा. सायमन सिनेक यांनी 2010 साली ‘उत्कृष्ट नेतृत्व करणाऱया व्यक्ती योग्य कृतींना कशा प्रकारे चालना देतात’ या विषयावर `TED Conference’मध्ये भाषण केले. खरं तर त्यांनी 2009 मध्येच `start with why` नावाचे पुस्तकही लिहिले होते, पण 2009 चे हे पुस्तक आणि 2010 चे हे भाषण कळायला मला 2023 उजाडावे लागले.

टेनिसची पंढरी समजल्या जाणाऱया विम्बल्डन -इंग्लंडमध्ये सायमन सिनेक या लेखक व प्रेरणादायी व्याख्यात्याचा जन्म झाला. इंग्लंड, हॉंगकॉंग आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या सायमन सिनेकने जगभरातील यशस्वी व्यक्तींचा, कंपन्यांचा अभ्यास केला आणि ‘का?’च्या सुवर्णवर्तुळाची संकल्पना मांडली. यूटय़ूबवर TED Talks च्या चॅनेलवर हा व्हिडीओ आहे. अठरा मिनिटांच्या या भाषणात सायमन सांगतात, कोणतीही व्यक्ती, आस्थापना, कंपनी सर्वात जास्त यशस्वी होण्यामागे काय कारण आणि विचार असेल? याचा शास्त्राsक्त अभ्यास केल्यावर त्यांना लक्षात आले की, तुम्ही ‘काय’ करता आणि ‘कसे’ करता यापेक्षा तुम्ही ते ‘का’ करता हे जास्त महत्त्वाचे आहे. सायमन यासाठी काही उदाहरणे देतात. काम्प्युटर्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱया अॅपल कंपनीचे. त्यांना जगावेगळे तंत्रज्ञान आणण्याचा ध्यास होता.

अमेरिकेत मानवी हक्कांची आणि वर्णभेदाविरुद्धची चळवळ उभारणारे डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या भाषणासाठी 1963 च्या कडक उन्हाळ्यात अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये फक्त तोंडी आमंत्रणावरून 2,50,000 मंडळी जमली होती. तोंडी आमंत्रणावरून एकाच दिवशी, एका वेळेला एवढे लोक हजर असणे हे त्या आत्यंतिक महत्त्वाच्या कारणाशिवाय शक्य झाले असते का? अमेरिकेत होणारी मानवी हक्कांची पायमल्ली रोखणे, वर्णभेदासारखा काळिमा दूर करणे हे अखिल मनुष्य जमातीसमोरचे आव्हान डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांना जाणवले व ते त्यांनी हे दूर करण्याचे स्वप्न पाहिले आणि तेच स्वप्न अमेरिकन नागरिकांना ते पटवून देऊ शकले. म्हणून आज डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांची जगाने नोंद घेतली.
ओर्वील आणि विल्बर या राइट बंधूंकडे विमान बनवताना जग बदलण्याची अतीव प्रेरणा, आंतरिक तळमळ होती आणि ती तळमळ ते त्यांच्या सहकाऱयांपर्यंत पोहोचवू शकले म्हणूनच ते यशस्वी होऊ शकले. खरं पाहता त्यावेळी सॅम्युअल लँगले या अमेरिकन अधिकाऱयाला त्यांच्या युद्ध विभागाने ऊर्जेच्या मदतीने अवकाशात झेपावणाऱया मनुष्यसहित यंत्राची निर्मिती करण्यासाठी पन्नास हजार डॉलर्स दिले होते, पण सॅम्युअल लँगलेकडे ती जिद्द, तो जग बदलणारा विचार नव्हता. आपल्या स्वप्नांवर आपल्या इतकेच प्रेम करणारी, ते स्वप्न जगणारी मंडळी नव्हती म्हणून सॅम्युअल लँगले हा कधीच विमानाची निर्मिती करू शकला नाही.

फ्रेडरिक नित्शे या जर्मन तत्त्ववेत्त्याचे एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे. – He, who has a why to live for can bear almost any how. ज्या माणसाकडे जगण्याचे सर्वोच्च कारण असते तो काहीही सहन करू शकतो. हा विचार फक्त व्यक्तींसाठीच नाही, तर संस्थांसाठीसुद्धा आहे. ज्या संस्थांकडे जगत्कल्याणाचे उद्दिष्ट असते त्या यशस्वी होतातच. TED Talks ही त्यापैकी एक. TED Talks आणि सायमन सिनेक यांचे यूटय़ूब चॅनेल जरूर ऐकण्यासारखे आहेत. सायमन सिनेक यांच्या वेबसाईटवरदेखील प्रेरणादायी आशावादी पॉडकास्टस् आहेत. स्पोटिफाय, यूटय़ूब,अॅपलवर ही पॉडकास्टस् ऐकता येतील.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)
[email protected]

Comments are closed.