ऐकावे जनांचे… – अमोल परचुरेंसोबत ‘कॅच अप’

>> अक्षय मोटेगावकर
[email protected]

चित्रपटसृष्टीबद्दलचे कुतूहल शमविणारा, मनोरंजन क्षेत्रात चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांमध्ये काम करणाऱया कलाकारासोबतचा अमोल परचुरे यांचा हा पॉडकास्ट ऐकावा असाच…
1980-2000 या काळात जन्मलेल्या पिढीतील बऱयाच मुला-मुलींचे बालपण हे चित्रपटांबाबतच्या, मनोरंजन क्षेत्रातील माहितीला चवीने वाचण्यात गेले. कोणता नवीन चित्रपट येतो आहे, कोणते अभिनेते, अभिनेत्री आहेत, त्यांच्या मेकअपचे किस्से, चित्रपटातील शूटिंगचे किस्से हे असं सगळं वाचण्यात त्यांचे बालपण गेले. वृत्तपत्रांच्या खास चित्रपट आणि चित्रनगरीला वाहिलेल्या पुरवण्या असायच्या, मासिके निघायची व त्याचा खपही भरपूर असायचा. त्यामुळे या पिढीचे चित्रपटसृष्टीबद्दलचे कुतूहल कितीही वय वाढले तरी कमी झाले नाही. या मनोरंजन क्षेत्रावर, चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणी माध्यमांमध्ये काम करणाऱया कलाकारासोबतचा एक पॉडकास्ट ऐकायला मिळाला तो म्हणजे अमोल परचुरे यांचा.

अमोल परचुरे मूळचे अभिनेते. त्यामुळे त्यांना या क्षेत्राची ओढ असणे स्वाभाविक. त्यांनी स्वत चित्रपटात काम केले आहे. झी न्यूज, सीएनबीसी आवाज आणि आयबीएन लोकमत या वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारितेचा 16 वर्षांचा अनुभव गाठीशी होता. चित्रपट समीक्षा आणि मुलाखतींचा ‘पॉपकॉर्न पे चर्चा’ हा लोकप्रिय कार्यक्रम केला होता. त्यामुळे कला क्षेत्रातील मंडळींना बोलावणे आणि त्यांना बोलते करणे हे त्यांच्यासाठी आवडते काम.

अमोल परचुरे ‘कॅच अप’ म्हणून एक पॉडकास्ट सीरिज करत, ज्यात आतापर्यंत दोनशेहून अधिक पॉडकास्टस आहेत. अभिनेते सुबोध भावे, ज्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बालगंधर्व, डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या, आपल्या समर्थ अभिनयाने कित्येक भूमिकांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले त्यांच्या सोबतचा भाग छान झाला आहे. सुबोध भावे, अमोल परचुरेंसोबत या बोलताना मराठी चित्रपटसृष्टी, अभिनय, चित्रपटांदरम्यानचे अनुभव यावर विस्ताराने बोलले आहेत.

13,333 नाटकांचे प्रयोग सादर केलेले ज्येष्ठ विनोदी अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबतच्या भागात पण धमाल आली आहे. नाटक व्यवसायात शिस्त आणणारे अभिनेते आणि निर्माते अशी ज्यांची ओळख असलेले प्रशांत दामले यांनी 13,333 व्या प्रयोगासाठी कशी तयारी केली, किती मज्जा केली. चित्रपट कमी करून पूर्णवेळ नाटकांसाठीच द्यायचे का ठरवले? या क्षेत्रातील अर्थकारण कसा आहे? पूर्वीच्या काळी नाटकांचे जे दौरे होते आणि आताच्या काळी होतात त्यात काय बदल झाले आहेत. नाटकातील, तालिमीदरम्यानच्या, प्रवासादरम्यानच्या गमतीजमती अशा खूप गोष्टींवर अमोल परचुरेंनी प्रशांत दामलेंना बोलते केले आहे. सामाजिक भान असणारे कलाकार अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या सोबतच्या पॉडकास्टमध्ये अतुल कुलकर्णीपासून ‘नटरंग’चा गुणा कागलकर होण्याचा प्रवास, सध्याचे उफाळून येणारे तंत्रज्ञान यावर भाष्य केले आहे. वेबसीरिजबद्दल त्यांचे मत स्पष्टपणे मांडले आहे.

प्रख्यात दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या सोबतचा भाग हा चुकवू नये असा आहे. पुरस्कार, दिग्दर्शकीय कारकीर्द यांच्या पुढे जाऊन महेश मांजरेकर कसे आहेत, चित्रपट करताना काय संघर्ष वाट्याला आले, सध्याचे तंत्रज्ञान कुठेतरी चित्रपट निर्मिती क्षेत्रातला आणि प्रक्रियेलाच आव्हान देत आहे का? अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांना या पॉडकास्टमध्ये बोलते केले आहे.

या पॉडकास्टसमध्ये अजून काही लक्षवेधी गोष्टी हाताला लागल्या त्या म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे, अजिंक्य देव, सुमित राघवन, चिन्मय मांडलेकर यांच्या सोबतचे पॉडकास्टस. अभिनेत्री प्रिया बापट, कविता लाड, अदिती गोवित्रीकर, गिरीजा ओक यांच्या सोबतचे पॉडकास्टस. त्यासोबतच दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, रवी जाधव यांच्या सोबतचे भाग, संगीतकार अजित परब, राहुल रानडे हे जरूर ऐकावे असे आहेत. त्या दुनियेची फार जवळून ओळख होते. जमेल तेव्हा नक्की ‘कॅच अप’ करा या पॉडकास्टबरोबर.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)

Comments are closed.