अल-फलाह विद्यापीठाची 140 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे अध्यक्ष जवाद सिद्दिकींवर मनी लाँड्रिंग आरोप : दिल्लीतील लाल किल्ला स्फोटानंतर विद्यापीठ निशाण्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलेल्या हरियाणास्थित अल फलाह विद्यापीठाची सुमारे 140 कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी जप्त केली. अल फलाह ग्रुपचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दिकी आणि त्यांच्या ट्रस्टविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) जारी केलेल्या तात्पुरत्या आदेशाचा भाग म्हणून फरिदाबादच्या धौज परिसरात असलेली विद्यापीठाची 54 एकर जमीन, विद्यापीठ इमारती, विविध शाळा आणि विभागीय इमारती आणि वसतिगृहे जप्त करण्यात आली आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने अल फलाह ट्रस्टच्या मालकीच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यांना ‘गुह्यातून मिळालेले उत्पन्न’ म्हणून वर्गीकृत करत आहे.
अल फलाह ट्रस्टचे संचालक जावेद अहमद सिद्दिकी यांना त्यांच्या ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ईडीने नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. या शैक्षणिक संस्थांकडे काम करण्यासाठी आवश्यक मान्यता नव्हती, असा एजन्सीचा दावा आहे. सिद्दिकी आणि अल फलाह ट्रस्टविरुद्ध विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोघांनाही आरोपी ठरवण्यात आले असून ईडीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याअंतर्गत खटला चालवण्याची मागणी केली आहे.
Comments are closed.