स्फोटाच्या धमकीनंतर दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला आहे

मंदिरे, गर्दीची ठिकाणे ‘तोयबा’च्या निशाण्यावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीमध्ये दहशतवादी संघटनांकडून घातपात घडवण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी संघटना गर्दीची ठिकाणे आणि मंदिरांना लक्ष्य करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. लष्कर-ए-तोयबा या संघटनेने घातपात घडवण्याचा इशारा दिला असून राजधानीतील विविध सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच या धमकीच्या माध्यमातून  लष्कर-ए-तोयबा ही संघटना पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर दहशतवादी बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी चांदणी चौकातील मंदिरालाही लक्ष्य करू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबा सक्रिय झाली असून आयईडी हल्ल्याचा कट रचत आहे. पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या मशिदीतील बॉम्बस्फोटाचा बदला घेण्यासाठी लष्कर-ए-तोयबा भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत आहे. देशातील प्रमुख मंदिरांना लष्कर-ए-तोयबा लक्ष्य करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर संस्थांनी महिनाभरापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी प्रजासत्ताक दिनादरम्यान खलिस्तानी दहशतवादी संघटना आणि बांगलादेशस्थित दहशतवादी संघटना दिल्ली आणि देशातील इतर अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात, असा इशारा मिळाला होता.

सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटना 6 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एका मशिदीत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटाचा बदला घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 160 हून अधिक जण जखमी झाले होते. तथापि, इस्लामिक स्टेट गटाने मशिदीवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

तीन महिन्यांपूर्वी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट

10 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या प्राणघातक कार बॉम्बस्फोटाच्या तीन महिन्यांनंतर आता पुन्हा एकदा दिल्लीत सतर्कता जारी करण्यात आली आहे. नोव्हेंबरमधील स्फोटात दिल्लीत 12 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच सुमारे दोन डझन जण जखमी झाले. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारच्या स्फोटात जवळपासच्या अनेक वाहनांना आग लागली होती. डीएनए चाचणी निकालांनुसार, फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातील डॉक्टर उमर मोहम्मद उर्फ उमर उन नबी हा स्फोट झालेली कार चालवत होता. या स्फोटानंतर संशयित दहशतवाद्यांचे मोठे जाळे सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त करत अनेकांना अटक केली होती.

Comments are closed.