Ratnagiri News- काही सेकंदांची सतर्कता अन् प्रवाशाला मिळाले जीवदान ! चिपळूण रेल्वे स्थानकावर होमगार्ड रोहित चिले यांची कर्तव्यतत्परता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रेल्वे स्थानकावरची काही क्षणांची असावधानता जीवघेणी ठरू शकते, मात्र त्याच क्षणी कर्तव्यावर असलेल्या जवानाची सतर्कता एखाद्याचे संपूर्ण आयुष्य वाचवू शकते. याचा प्रत्यय रात्री चिपळूण रेल्वे स्थानकावर आला. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रात्रपाळीची ड्युटी बजावत असलेले होमगार्ड रोहित चिले गस्त घालत असताना, डबा क्रमांक १५-१६ जवळ रेल्वेत चढताना एका प्रवाशाचा अचानक तोल गेला. तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील धोकादायक जागेत जाण्याच्या स्थितीत असल्याचे लक्षात येताच चिले यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

काही सेकंदांचा विलंबही जीवावर बेतू शकला असता, मात्र रोहित चिले यांच्या सतर्क नजरेने आणि तातडीच्या कृतीने संभाव्य दुर्घटना टळली. कर्तव्य म्हणजे केवळ उपस्थिती नव्हे, तर संकटाच्या क्षणी योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी असते, हे त्यांच्या कृतीने अधोरेखित केले. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, चिपळूण शहर यांच्या वतीने रेल्वे स्थानकावर जाऊन होमगार्ड रोहित चिले यांचा सत्कार करण्यात आला. युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे आणि जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे यांच्या उपस्थितीत हा सत्कार युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विभाग अधिकारी राहुल गुरव, शिवसैनिक मनिष कोलगे, वेदांत शितप, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक दुदुमकर, चिपळूण तालुका पथक समादेशक अधिकारी तुषार मिस्त्री, जीआरपी पोलीस खांडेकर, होमगार्ड ओंकार पवार, राज चिले, सर्जेराव मोलावडे आदी उपस्थित होते. रेल्वे प्रवाशांनीही धावत्या गाडीत चढणे-उतरणे टाळून, प्लॅटफॉर्म व रेल्वेतील अंतराची जाणीव ठेवत सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. रोहित चिले यांची ही कर्तव्यतत्परता केवळ एका प्रवाशाचे प्राण वाचवणारी ठरली नाही, तर रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचा संदेश देऊन गेली.

Comments are closed.