अलेक्झांडर झ्वेरेवची US Open जिंकण्याची अखेर स्वप्नपूर्ती, चार सेटच्या थरारात बेन शेल्टनचा केला पराभव

जर्मनीचा स्टार टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव्ह यंदा चांगलाच फॉर्ममध्ये आहे. याचवर्षीच्या जून महिन्यात फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर त्याने आता यूएस ओपन जिंकण्याची कामगिरी केली आहे. रविवारी (13 सप्टेंबर) यूएस ओपन 2026 चा पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळला गेला. यामध्ये त्याने स्थानिक खेळाडू बेन शेल्टन याचा 6-3, 7-6 (2), 5-7, 6-2 असा पराभव केला.

आर्थर ऍश स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या विजयानंतर झ्वेरेव्हची सहा वर्षांची स्वप्नपूर्ती झाली. याच कोर्टवर त्याला सहा वर्षांपूर्वी विजेतेपद जिंकण्याचे स्वप्नभंग झाले होते. 2020 च्या यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात झ्वेरेव्हला ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

जर्मनीच्या खेळाडूने शेल्टनचा पराभव करत अमेरिकन चाहत्यांची मने दुखावली. पहिला सेट 6-3 ने जिंकल्याने झ्वेरेव्हने शेल्टनला बॅकफूटवर ढकलले. दुसरा सेट टाय-ब्रेकमध्ये गेला. तो सुद्धा झ्वेरेव्हनेच जिंकला. त्याने हा सेट 7(7)- 6(2) असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये शेल्टनने चांगली कामगिरी केली.

तिसऱ्या सेटमध्ये एका क्षणी दोघे 5-5 असे बरोबरीत होते, मात्र अमेरिकेच्या खेळाडूने अप्रतिम शॉट्स मारले आणि सेट 7-5 असा जिंकला. शेल्टनचा खेळ पाहता तो चौथा सेटही जिंकेल, असे वाटत होते. पण चौथ्या सेटमध्ये पुन्हा एकदा झ्वेरेव्हचे वर्चस्व दिसले. त्याने चौथा सेट 6-2 असा जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

Comments are closed.