अलिबाग नगर परिषद निवडणूक, शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढणार

2 डिसेंबरला होणाऱ्या अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची ग्वाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली. अलिबागच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून येथील जनता शिवसेना महाविकास आघाडीलाच कौल देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अलिबागसह रायगड जिल्ह्यातील खोपोली उरण, पेण, मुरुड-जंजिरा, रोहा, श्रीवर्धन, माथेरान या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. अलिबागमध्ये 20 जागा असून नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. एकूण 10 प्रभाग असून 16 हजार 354 मतदार आपला हक्काचा नगरसेवक, नगराध्यक्ष निवडणार आहेत. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अलि बागच्या 10 जागा लढवण्याची आमची तयारी आहे.

सत्ताधाऱ्यांना जाब विचारू

राज्यात व जिल्ह्यात महाविकास आघाडी भक्कम असून नगर परिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवली जाणार आहे. अलिबागमधील पर्यटन, रोजगार, रस्ते, शेतकरी, जलवाहतूक यासंदर्भातील अनेक प्रश्न असून सरकार हे प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. या सत्ताधाऱ्यांना आम्ही निवडणुकीत जाब विचारणार असल्याचे भोईर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सर्वांना सोबत घेऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा सल्लागार सतीश पाटील, शहरप्रमुख सुरेंद्र पालकर, माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.