रायगडात मोहोर काळवंडला; आंबा धोक्यात, ढगाळ वातावरण, उष्णतेचा पारा वाढू लागल्याने बागा संकटात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बदलत्या हवमानाचा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा पिकाला बसत आहे. ढगाळ वातावरण तसेच उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढू लागल्याने मोहोर काळवंडू लागला आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये चिंता वाढली असून हे पीक वाचवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. लहरी हवामानामुळे केवळ आंबा पीकच नव्हे तर काजूच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने डोंगराळ भागात आंबा व काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी भातशेती सोडून आंबा लागवडीकडे मोर्चा वळवला आहे. मात्र मागील हंगामात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे चालू हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र सध्याच्या बदलत्या हवामानामुळे पुन्हा एकदा आंबा व काजू उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पुढील काही दिवसांतील हवामानावर यंदाच्या आंबा व काजू पिकाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

  • रायगड जिल्ह्यात सुमारे ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पीक लागवड असून यामधील १६ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. रायगडातील आंबा हा चवदार असल्याने त्याला मोठी मागणी असते.
  • यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाने जोर धरल्याने आंबा व काजूच्या मोहोरधारणेला उशीर झाला होता. मात्र डिसेंबर महिन्यात थंडीची तीव्रता वाढल्यानंतर मोहोरासाठी पोषक वातावरण निर्माण झाले.
  • रायगड जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये आंबा आणि काजूला चांगल्या प्रकारे मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. चालू हंगाम आंबा पिकासाठी अनुकूल ठरेल, अशी आशा प्रगतशील बागायतदार शांताराम पाटील यांनी व्यक्त केली होती.

बुरशीजन्य औषधांचा वापर करा

मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील तापमानात वाढ होऊन आर्द्रता जाणवू लागल्याने मोहोरावर विपरीत परिणाम होत आहे. याचा थेट फटका आंबा व काजूच्या मोहोराला बसत असून मोहोर गळण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी बुरशीजन्य औषधांचा वापर करावा, असे आवाहन कृषीतज्ज्ञ व अधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments are closed.