तिजोरीत खडखडाट, वाहतूक बंद; 177 कोटींचा अलिबाग-रोहा राज्य महामार्ग रखडला

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रोहा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. 177कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या रस्त्याचे काम रखडले आहे. रामराज ते सुडकोली दरम्यानचे पाच पूल धोकादायक अवस्थेत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने अलिबाग-रोहा मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बससेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद झाली आहे.

अलिबाग- रोहा या रस्त्याच्या कामासाठी 177 कोटी रुपये निधी मंजूर झाला. हॅम अंतर्गत मंजूर झालेल्या अलिबाग-रोहा रस्त्याचे काम गुजरातमधील ‘मेसर्स जेआरए अलिबाग रस्ता प्रकल्प प्रा. लि.’ या ठेकेदार एजन्सीला देण्यात आले. या कामांतर्गत अलिबाग-रोहा-साई हा 85 किलोमीटरचा दुपदरी मार्ग करण्यात येणार आहे. औद्योगिकीकरणाला चालना देणाऱ्या या मार्गाची कनेक्टिव्हिटी पुढे दिघी पोर्टपर्यंत असणार आहे. मात्र या महामार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने ठेकेदाराचे वीस कोटी रुपये रखडवले असल्याने ठेकेदाराने रस्त्याचे काम बंद केले आहे.

धोकादायक पूल

1. रामराज पूल
2. स्लॅब कलवर्ट
3. स्लॅब कलवर्ट
4. सुडकोली पूल
5. सुडकोली पूल

अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा प्रवास नेहमी या रस्त्यावरून होत असतो. मात्र त्यांच्या उदासीन भूमिकेमुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. परिणामी या भागातील नागरिकांना आणि वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Comments are closed.