SA vs NZ: सेमीफायनलसाठी दक्षिण आफ्रिकेची रणनीती ठरली? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी संघात 3 मोठ्या बदलांची शक्यता

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच उपांत्य (सेमीफायनल) आणि अंतिम सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (South Africa vs Newzealand) यांच्यात रंगणार आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ तिथे दाखल झाले आहेत.

या मोठ्या लढतीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात बदलांची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध आपल्या मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्यावेळी जॉर्ज लिंडे, एनरिक नॉर्खिया आणि क्वेना मफाका यांना संधी देण्यात आली होती. तर, झिम्बाब्वेविरुद्ध जॉर्ज लिंडेने फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली चमक दाखवली, तर मफाका आणि नॉर्खियानेही विकेट्स घेतल्या. मात्र, सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यासाठी या तिघांनाही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते.

न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका आपल्या अनुभवी खेळाडूंना पुन्हा संघात स्थान देऊ शकते. या वर्ल्ड कपमध्ये मार्को यानसेनने (Marco Yansen) 5 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत. तो आपल्या अष्टपैलू खेळाने कधीही सामन्याचे पारडे फिरवू शकतो. तसेच कगिसो रबाडाकडे (Kagiso rabada) 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा मोठा अनुभव असून त्याच्या नावावर 82 विकेट्स आहेत.

अनुभवाच्या जोरावर त्याला संघात प्राधान्य मिळू शकते. त्याच्यासोबतच फिरकीपटू केशव महाराजने (Keshav Maharaj) या स्पर्धेत 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा अनुभव पाहता, न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यासाठी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश निश्चित मानला जात आहे. आता दक्षिण आफ्रिकेचे संघ व्यवस्थापन प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी मैदानात किती बदल करते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.