भारतातील सर्व राफेल विमाने सुरक्षित आहेत.

पाकिस्तानी दुष्प्रचार धादांत खोटा असल्याचे सिद्ध

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताची सर्व 36 राफेल विमाने पूर्णत: सुरक्षित असून ती भारतीय वायुदलात कार्यरत आहेत, हे पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. भारताची राफेल विमाने ‘सिंदूर अभियाना’त पाडविल्याचे खोटे प्रतिपादन पाकिस्तानने अनेकवेळा केले आहे. भारतातील विरोधी पक्षांनीही पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळून राफेल विमाने सुरक्षित आहेत की नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तथापि, भारतीय वायुदलाच्या कागदपत्रांनुसार आणि या विमानांच्या नोंदीनुसार सर्व राफेल विमाने सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताने थेट फ्रान्स सरकारशी करार करून एकंदर 36 राफेल विमाने खरेदी केली आहेत. या विमानांचा तंत्रवैज्ञानिक आणि इतर प्रकारचा आधार आजही फ्रान्सच्या देसाँ कंपनीकडून दिला जातो. या आधाराचा कालावधी सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. पण तो सप्टेंबरनंतरही मिळत रहावा, अशी मागणी भारताच्या वायुदलाने या कंपनीकडे केली आहे. या संबंधीच्या पत्रातील आशय आता काही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केला असून भारताने सर्व 36 राफेल विमानांसाठी या तांत्रिक आणि लॉजिस्टिक आधाराची मागणी केली असल्याचे या पत्रातून स्पष्ट होत आहे.

पाकिस्तानचा वारंवार दुष्प्रचार

‘सिंदूर अभियाना’त भारताची अनेक राफेल विमाने पाडविण्यात आली, असा दुष्प्रचार पाकिस्तानने वारंवार केला आहे. तथापि, विमाने पाडविल्याचा एकही पुरावा पाकिस्तानने सादर केलेला नाही. भारताने मात्र आपले राफेलचे सर्व वैमानिक सुरक्षित असल्याचे प्रतिपादन त्याचवेळी केले होते. तथापि, पाकिस्तानचा दुष्प्रचार थांबला नव्हता. पण आता भारतीय वायुदलाचे जे पत्र उघड झाले आहे, त्यातून हे स्पष्ट होते की भारताच्या एकाही राफेल विमानाला धोका पोहोचलेला नाही. ती सर्व सुरक्षित आहेत. जर काही विमाने नष्ट झाली असती तर भारताच्या वायुदलाने त्या विमानांसाठी लॉजिस्टिक आधाराची मागणी केली नसती. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा या संदर्भात तोंडावर पडल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

विरोधी पक्षांचीही कोंडी

भारताने ‘सिंदूर अभियाना’त राफेल विमाने गमावल्याचा आरोप भारतातील काही विरोधी पक्षनेत्यांनीही केला होता. या अभियानाच्या प्रथम दिवशी भारताचा पराभव झाला होता, असा निखालस खोटा प्रचारही भारतातीलच काही ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी केला होता. भारताच्या वायुप्रहार क्षमतेसंबंधी शंकाही विरोधकांनी व्यक्त केली होती. तथापि, नव्या कागदपत्रांमुळे विरोधकांचीही कोंडी झाली आहे.

नेमके झाले होते काय…

‘सिंदूर अभियाना’च्या प्रथम दिवशी भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी राफेल विमानांचा उपयोग केला. मात्र, प्रत्यक्ष राफेल विमाने संघर्षात आणण्याच्या आधी, भारतीय वायुदलाने काही ‘बनावट’ राफेल विमाने पाकिस्तानला चकवा देण्यासाठी उपयोगात आणली होती. पाकिस्तानची वायू संरक्षण रडार यंत्रणा कितपत प्रभावी आहे, हे पडताळण्याचा यामागे हेतू होता. ही पडताळणी झाल्यानंतर खरी राफेल विमाने उपयोगात आणण्यात आली आणि पाकिस्तानची प्रचंड हानी करण्यात आली. ही बाब भारताने पुढच्या संघर्षांची शक्यता लक्षात घेऊन गुप्त ठेवली होती. त्यामुळे भारताने आपली सर्व राफेल विमाने सुरक्षित असल्याचे स्पष्टपणे उघड केले नव्हते. तथापि, काही विदेशी प्रसार माध्यमांनी भारताचे हे तंत्र त्याचवेळी स्पष्ट करत राफेल विमाने सुरक्षित असल्याचे प्रतिपादन केले होते. ही विमाने उत्पादित करणाऱ्या देसाँ कंपनीनेही राफेल विमाने पडल्याच्या आरोपांना नाकारले होते. आता भारतीय वायुदलाच्या कागदपत्रांवरुन सर्व राफेल विमाने सुरक्षित असल्याचे आणि पाकिस्तान तसेच भारतातील विरोधी पक्ष यांचा अपप्रचार खोटा असल्याचे सिद्ध होत आहे, असे तज्ञांचे मत आहे.

कोणताही पुरावा नव्हताच…

राफेल विमाने पडल्याचा कोणत्याही पुरावा त्यावेळीही कोणीही समोर आणला नव्हता. खरोखरच राफेल विमाने पडली असती, तर त्यांचे अवशेष सापडले असते. तसेच, उपग्रहीय प्रतिमा तंत्रज्ञानाच्या (सॅटलाईट इमेजरी) माध्यमातून विमाने पडल्याची बाब निर्विवादपणे समोर आली असती. जगात कोठेही विमान पडले तर ते पडतानाची छायचित्रे नंतर प्रसिद्ध केली जातात. तथापि, राफेल विमाने पडल्याचे कोणतेही छायाचित्र कोणत्याही देशांकडून किंवा खासगी कंपन्यांच्या उपग्रहांच्या माध्यमातूनही समोर आले नव्हते. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा त्याचवेळी सिद्ध झाला होता. नव्या कागदपत्रांच्या माध्यमातून तो पुन्हा सिद्ध झाला आहे.

पाकिस्तानसमवेत विरोधकाही पडले उघडे

ड एकही राफेल विमान पडल्याचे आजवर कधीही झालेले नाही सिद्ध

ड उपग्रहीय प्रतिमा चित्रणाचाही कोणताही पुरावा आलेला नाही समोर

ड पाकिस्तानच्या अशा दुष्प्रचारात भारतातले विरोधी पक्षही सहभागी

ड वायुदलाच्या कागदपत्रांच्या अनुसार राफेल सुरक्षित असल्याचे स्पष्ट

Comments are closed.