मध्य प्रदेशात भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत.

राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवड : काँग्रेसला धक्का

वृत्तसंस्था/भोपाळ

काँग्रेसच्या एका उमेदवारचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने मध्यप्रदेशात भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या तीनही जागांवर विजय प्राप्त केला आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या अनुसार भारतीय जनता पक्षाला दोन तर काँग्रेसला एक जागा मिळणे आवश्यक होते. तथापि, भारतीय जनता पक्षाने तिसऱ्या जागेसाठींही उमेदवार दिला होता. तो निवडून येण्याची शक्यता नव्हती. तथापि, काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज अवैध ठरल्याने काँग्रेसने संधी गमावली. अखेरीस 2026 च्या राज्यसभा निवडणुकीत रजनीश अग्रवाल, तरुण चुघ आणि महेश केवट हे मध्यप्रदेशातील भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाने गुरुवारी या तिघांनाही त्यांची निवडणूक प्रमाणपत्रे जारी केली.

निवडणूक नियमांनुसार, रिंगणातील उमेदवारांची संख्या जागांच्या संख्येइतकी असल्यास त्यांना बिनविरोध विजेते घोषित केले जाते. नटराजन यांचा अर्ज मंगळवारी अवैध ठरविण्यात आला. त्यांनी त्यांच्या विरोधात असणाऱ्या एका गुन्हेगारी प्रकरणाची माहिती त्यांच्या निवडणूक अर्जामध्ये समाविष्ट केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या अर्जाची छाननी होत असताना, भारतीय जनता पक्षाच्या तिसऱ्या उमेदवाराने त्यांच्या अर्जाला आक्षेप घेतला. इतकेच नव्हे, तर मीनाक्षी नटराजन यांना या प्रकरणाच्या संदर्भात न्यायालयाकडून आलेली नोटीसही भारतीय जनता पक्षाने निवडणूक अधिकाऱ्याला सादर केली. त्यामुळे नटराजन यांनी माहिती दडविल्याचे कारण स्पष्ट करत अधिकाऱ्याने अर्ज अवैध ठरविला.

काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात, पण…

निवडणूक अधिकाऱ्याच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने प्रथम केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली होती. निवडणूक अधिकाऱ्याचा अर्ज अवैध ठरविण्याचा निर्णय बेकायदेशीर असून तो निर्णय मागे घेण्यात यावा आणि नटराजन यांना या निवडणुकीत सहभागी होण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. तथापि, आयोगाने निर्णय दिलेला नाही. त्यानंतर गुरुवारी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण नेले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर त्वरित सुनावणी करण्यास नकार दिल्याने गुरुवारीच निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्यात काँग्रेस अपयशी ठरला. आता आज शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र, आता राज्यसभा निवडणुकीच्या मध्यप्रदेशातल्या सर्व तीन जागांचा निर्णय घोषित झाल्याने या प्रकरणाची सुनावणी आता निष्फळ ठरली आहे, असे कायदेतज्ञांचे मत आहे.

भाजपचे विजयी उमेदवार

या निवडणुकीत मध्यप्रदेशातून भारतीय जनता पक्षाच्या दोन जागा येणार हे निश्चित होते. या पक्षाने तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. ते दोघेही निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे तिसरे उमेदवार महेश केवट यांना मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात उमेदवारी ऐनवेळी दिली. या निवडणुकीत आपली मते फुटतील, अशी शक्यता वाटल्याने काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना कर्नाटकात रिझॉर्टमध्ये हलविण्यासाठी हालचाली चालविल्या होत्या. या सर्व आमदारांना भोपाळच्या विमानतळावर नेण्यातही आले होते. तथापि, तेव्हढ्यात मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याचे वृत्त समजल्याने या आमदारांना विमानतळावरुनच त्यांच्या निवासस्थानी परतावे लागले होते. अशा प्रकारे राज्यसभा उमेदवाराचा स्वतंत्र अर्ज रद्द होण्याची घटना दुर्मिळ आहे, असे मत अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. आता आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीचा परिणाम काय होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Comments are closed.