भाजप आणि अण्णाद्रमुक यांच्यात युतीची चर्चा.

पलानीस्वामी यांच्यात जागावाटप बोलणी

वृत्तसंस्था / चेन्नई

भारतीय जनता पक्ष आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांमध्ये तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडू प्रभारी आणि केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी अद्रमुकचे महासचिव एडापल्ली के. पलानीस्वामी यांच्याशी चेन्नई येथील एका हॉटेलात प्राथमिक बोलणी केली आहेत. अद्रमुक हा पक्ष तामिळनाडू राज्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करीत आहे.

तामिळनाडूच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर पियुष गोयल यांची ही प्रथम तामिळनाडू भेट आहे. या राज्यात इतर तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासह येत्या एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यावर लक्ष ठेवण्याचे उत्तरदायित्व गोयल यांच्यावर आहे.

अनेक नेते समाविष्ट

या चर्चेत पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय नेते आणि स्थानिक नेत्यांचा समावेश होता. भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडू निवडणूक सहप्रभारी आणि केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडू राज्यशाखेचे अध्यक्ष नयनार नागेंद्रन, या पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी अरविंद मेनन आणि सहप्रभारी पी. सुधाकर रे•ाr यांनी पियुष गोयल यांच्यासह अद्रमुकच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळात अद्रमुकचे महासचिव पलानीस्वामी यांच्यासह तामिळनाडूतील माजी मंत्री के. पी. मुनुस्वामी, एस. पी. वेलुमणी, दिंडीगुल सी. श्रीनिवासन आणि पी. थंगामणी या नेत्यांचा समावेश होता.

प्राथमिक चर्चा आणि स्नेहभोजन

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अद्रमुकचे शिष्टमंडळ यांच्यीतल ही चर्चा प्राथमिक स्वरुपाची होती, अशी माहिती देण्यात आली. या चर्चेत कोणताही ठोस निर्णय होण्याची शक्यता नव्हती. तथापि, एकमेकांच्या भूमिका समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चर्चेनंतर स्नेहभोजनाचाही कार्यक्रम झाला. ही बैठक साधारणत: दोन तास चालली. तेलंगणाच्या माजी राज्यपाल आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तामिळसाई सुंदरराजन आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्षा वनथी श्रीनिवासन यांनीही चर्चेत भाग घेतला. जागावाटप यशस्वी होण्याची शक्यता दोन्ही बाजूंकडून व्यक्त केली गेली.

Comments are closed.