मित्रपक्ष काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करतात

एआय परिषदेत केलेला प्रकार अयोग्य, भारताची प्रतिमा डागाळल्याचा आरोप, काँग्रेस पडली एकाकी

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली

येथे आयोजित ‘जागतिक एआय परिषदे’च्या स्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले ‘सदराविहीन’ आंदोलन काँग्रेसलाच भोवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनावर आता काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जोरदार टीका केली असून हा प्रकार काँग्रेसने टाळायला पाहिजे होता, असे मतप्रदर्शन केले आहे. काँग्रेसवर टीका करणाऱ्या पक्षांमध्ये समाजवादी पक्ष, वायएसआर काँग्रेस इत्यादींचा समावेश आहे.

काँग्रेसने ही निदर्शने शुक्रवारी केली होती. काँग्रेसचे दहा कार्यकर्ते पास मिळवून एआय परिषदेच्या परिसरात आले आणि त्यांनी त्यांच्या अंगावरचे सदरे काढून घोषणा दिल्या. भारत-अमेरिका व्यापार कराराला विरोध करण्यासाठी ही निदर्शने केली गेली, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तथापि, भारतात एक महत्वाची  आंतरराष्ट्रीय परिषद होत असताना भारतातल्याच एका राजकीय पक्षाने अशा प्रकारे तेथे आंदोलन केल्याने भारताची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप होत आहे.

काँग्रेसच्या मित्रपक्षांचीही टीका

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी या प्रकारासंबंधी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही परिषद भारताच्या दृष्टीने महत्वाची आहे. अशा स्थानी अशा प्रकारचे आंदोलन करणे अयोग्य आहे. विदेशी अतिथींच्या समोर असे केल्याने भारताची प्रतिमा मलीन होते. यामुळे विरोधी पक्षांच्या प्रतिमेलाही धक्का पोहचला आहे. असा गोंधळ घालायची कृती टाळावयास हवी होती. जे झाले, ते योग्य झाले नाही. या संबंधात आम्ही केंद्र सरकारचे समर्थन करीत आहोत, अशी स्पष्ट प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी शनिवारी पत्रकारांसमवेत बोलताना व्यक्त केली.

मायावतींचा हल्लाबोल

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही काँग्रेसने देशाची प्रतिमा बिघडविल्याचा आरोप केला आहे. ही एआय परिषद केवळ भारतीयांसाठी असती, तर काँग्रेसचे आंदोलन एकवेळ समजून घेता आले असते. तथापि, ही परिषद जागतिक होती. या परिषदेला केवळ देशातीलच नव्हे, तर विदेशांमधून अनेक विख्यात नेते आणि उद्योजक उपस्थित होते. त्यांच्यासमोर अशा प्रकारचे आंदोलन केल्याने देशाच्या प्रतिमेला धक्का पोहचला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत अशी कृती करणे ही चिंतेची बाब आहे. असे प्रकार टाळावयास हवेत. प्रत्येक राजकीय पक्षाने भारताची प्रतिमा मलीन होऊ नये, म्हणून दक्षता घ्यावयास हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

वायएसआर काँग्रेसकडून प्रहार

आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसनेही काँग्रेसने असे आंदोलन करावयास नको होते, अशी भूमिका घेतली आहे. या आंदोलनाचा काँग्रेसला काहीही लाभ होणार नाही. कारण, लोकांना हे आवडलेले नाही. जागतिक परिषदांमध्ये भारताने आपली एकजूट दाखवून दिली पाहिजे. हे आंदोलन याच्या नेमके विपरीत होते. ते टाळावयास हवे होते, अशी प्रतिक्रिया वाय. एस. जगन्मोहन रे•ाr यांनी मांडली.

तेलगू देशमचा घणाघात

महत्वाच्या जागतिक परिषदेत काँग्रेसने केलेल्या अशा प्रकारच्या आंदोलनामुळे भारताची मान खाली गेली आहे. हा लाजिरवाणा प्रकार आहे. एआय परिषदेसारख्या विषयात अशा प्रकारे राजकारण घुसविणे हा प्रकार पटण्यासारखा नाही. भारत एक उगवती एआय महाशक्ती आहे. देशाशी संबंधित सर्वांनी त्याप्रकारे वर्तणूक ठेवावयास हवी , अशी टीका तेलगु देशम पक्षानेही केली आहे. एकंदरीतच, काँग्रेसच्या या आंदोलनाची प्रशंसा फारशी कोणी केल्याचे दिसून आलेले नाही. सोशल मिडियावरही काँग्रेस विरोधात टीकेचा  भडिमार होत असल्याचे पहावयास मिळते. सरकारविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी तो कोठे आचरायचा हे भान आवश्यक आहे, असे बोलले जात आहे.

लोकशाहीत सर्वांना अधिकार

लोकशाहीत सर्वांना त्यांची मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. काँग्रेसलाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली. मित्रपक्षांनीच या आंदोलनावर तीव्र आक्षेप घेतल्याने काँग्रेसची कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता पक्षाने सौम्य भूमिका घेतल्याचेही संकेत आहेत. मित्रपक्षांच्या टीकेवर काँग्रेसने उलटून वार केल्याचे दिसून आलेले नाही.

काँग्रेसची भूमिका अयोग्य

ड विदेशी अतिथी देशात आलेले असताना असे आंदोलन टाळणे आवश्यक

ड काँग्रेसच्या आंदोलनावर मित्र पक्षही पडले तुटून, अनावश्यक कृती टाळा

ड तेलगु देशम, वायएसआय काँग्रेस, समाजवादी पक्षाची काँग्रेसवर नाराजी

ड भारतीय जनता पक्षाचेही काँग्रेसविरोधात आंदोलन, कार्यालयासमोर निदर्शने

Comments are closed.