IND vs WI: आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी दिलासादायक बाब समोर! वेस्टइंडीजचा मॅच विनर खेळाडू जखमी

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेच विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे (Team india Won asia cup 2025). या स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्टइंडीजविरुद्ध घरच्या मैदानावर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे (IND vs WIND). 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही मालिका सुरू होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी वेस्टइंडीज संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शमर जोसेफनंतर (Shamar Joseph) आता संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफही (Alzarri Joseph) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी वेस्टइंडीज निवड समितीने बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये अल्जारी जोसेफने वेस्टइंडीजसाठी आतापर्यंत 124 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमुळे त्याला भारतीय मैदानांवर खेळण्याचा अनुभवही आहे. त्यामुळे तो आपल्या वेगवान माऱ्याने भारतीय फलंदाजांना त्रास देऊ शकला असता. पण त्याचे बाहेर पडणे हे टीम इंडियासाठी दिलासा देणारे ठरले आहे. यामुळे वेस्टइंडीजची गोलंदाजी आणखी कमजोर झाली आहे. अल्जारीला लोअर बॅक (कंबर) दुखापत झाली आहे. काही दिवसांपासून त्याला याची समस्या होती, स्कॅन केल्यानंतर जुन्या दुखापतीने परत डोके वर काढले आहे असे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला काही काळ मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.

अल्जारी जोसेफच्या जागी वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने युवा जेडियाह ब्लेड्सला (Jediah Blades) संघात स्थान दिले आहे. जेडियाहने वेस्टइंडीजसाठी टी20 आणि वनडे फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे, मात्र कसोटीत त्याला अद्याप संधी मिळालेली नाही. या मालिकेतही तो फक्त बॅकअप म्हणूनच असणार आहे. दुसरा कोणता खेळाडू चुकून दुखापतग्रस्त झाल्यासच त्याला मुख्य संघात संधी मिळेल. सध्या तो नेपाळविरुद्ध टी20 मालिकेत खेळत आहे. वेस्टइंडीजच्या वेगवान गोलंदाजीत आता नवे चेहरे दिसत आहेत आणि भारतीय परिस्थितीत हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

Comments are closed.