कडेकोट बंदोबस्तात अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे.

वृत्तसंस्था/ अमरनाथ, श्रीनगर

वार्षिक श्री अमरनाथ यात्रा 2026 शुक्रवारी सुरू झाली. कडक सुरक्षा, व्यापक प्रशासकीय व लॉजिस्टिकल व्यवस्थेमध्ये हजारो यात्रेकरू भगवान शिवाच्या पवित्र गुहेत पोहोचण्यासाठी यात्रेला निघाले आहेत. यावर्षी 57 दिवसांची श्री अमरनाथ यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे मोठ्या संख्येने यात्रेकरूंना या पवित्र यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल.

गुरुवारी, यात्रा सुरू होण्याच्या एक दिवस आधी यात्रेकरूंची पहिली तुकडी सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली जम्मू येथील भगवती नगर यात्री निवास येथून निघाली. गांदरबल जिह्यातील बाल्टाल व अनंतनाग जिह्यातील नुनवान (पहलगाम) येथील दोन बेस कॅम्पवर पोहोचले होते. त्यानंतर एकूण 4,822 यात्रेकरू दोन ताफ्यांमधून कडक सुरक्षा व्यवस्थेत यात्रेला निघाले. यांपैकी 2,510 भाविक नुनवान (पहलगाम) बेस कॅम्प, तर 2,312 भाविक बाल्टाल बेस कॅम्पच्या मार्गाने पुढे रवाना झाले.

बाल्टालला पोहोचल्यावर जम्मू काश्मीरचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच परिवहन मंत्री सतीश शर्मा, सशस्त्र पोलिसांचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) मकसूद उल जमान, गांदरबलचे उपायुक्त जतीन किशोर आणि गांदरबलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुधांशू धामा यांनी भाविकांचे स्वागत केले. अधिकारी आणि मंत्र्यांनी भाविकांना सुरक्षित, शांततापूर्ण व आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

गांदरबल पोलीस, नागरी प्रशासन, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), आरोग्य विभाग आणि इतर संबंधित संस्थांच्या समन्वयाने व्यापक सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांची व्यवस्था करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना सांगितले. मार्गदर्शन, आपत्कालीन मदत पुरवण्यासाठी आणि प्रवास सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाने यात्रा मार्गावर ‘हेल्पिंग हँड’ पथके, मदत केंद्रे आणि 24 तास पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

प्रशासनाकडून यंत्रणेमध्ये सुसज्जता

यात्रेच्या मार्गावर दर 2 किलोमीटरवर ऑक्सिजन बूथ उभारण्यात आले आहेत. डोमल मार्गावर चार ठिकाणी मोठ्या क्रीनद्वारे हवामानाची माहिती दिली जात आहे. बाल्टाल मार्गावर 12 ठिकाणी जलरोधक घुमट उभारण्यात आले आहेत. श्री अमरनाथजी तीर्थक्षेत्र मंडळ, भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस, सुरक्षा दल, नागरी प्रशासन, स्थानिक रहिवासी, सेवा पुरवठादार आणि स्वयंसेवकांनी यावर्षीची अमरनाथ यात्रा सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी विस्तृत व्यवस्था केली आहे. जम्म काश्मीर पोलिसांनी प्रत्येक यात्रेकरूला एक सुरक्षित आणि अविस्मरणीय यात्रेचा अनुभव देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

Comments are closed.