गोव्याची 10 वर्षीय अमायरा धुमटकर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी – TMarathiNews
मडगाव : गोव्याची प्रतिभावान बॅडमिंटनपटू अमायरा धुमटकर हिने छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या पाचव्या मिनी (11 वर्षांखालील) राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अवघ्या 10 व्या वर्षी राष्ट्रीय विजेतेपद मिळवणारी ती गोव्याची पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे.
मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात अमायराने कर्नाटकच्या ज्योत्स्ना विनोदचा 15-11, 15-9 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. भारतात प्रथम मानांकन असलेल्या अमायराने अंतिम फेरीत सातत्यपूर्ण खेळ करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. गेल्या वर्षी गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले होते. यंदा सुवर्णपदक पटकावत तिने आपल्या कामगिरीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
अमायरासाठी हा महिना दुहेरी यशाचा ठरला. याआधी 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान मुंबईत झालेल्या अखिल भारतीय सब-ज्युनियर रॅकिंग बॅडमिंटन स्पर्धेत तिने तेलंगणाच्या सायना शर्मासोबत 13 वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकाने तिच्या यशात भर घातली आहे.
अमायरामध्ये विशेष प्रतिभा : मनोज पाटील
अमायरामध्ये विशेष प्रतिभा असून या स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तिने मोठी मेहनत घेतली आहे. तिला ही संधी मिळावी यासाठी तिच्या कुटुंबीयांनीही मोठे त्याग केले आहेत, असे गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले. अमायराचे ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लहान वयातच बॅडमिंटनची ओळख
अमायराची बॅडमिंटनशी ओळख लहान वयातच झाली. तिचे पहिले प्रशिक्षक विनायक कामत यांनी तिच्यातील नैसर्गिक टायमिंग, चपळ प्रतिक्रिया आणि स्पर्धात्मक वृत्ती हेरली. खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता स्पर्धात्मक पातळीवर पुढे जाण्याची तिची इच्छा त्यांनी ओळखली.
वयाच्या सहाव्या वर्षापासून अमायराने विजेतेपदे मिळवण्यास सुरुवात केली. सातव्या वर्षी तिने राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत 11 वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे गोव्यातील आश्वासक युवा बॅडमिंटनपटूंमध्ये तिची ओळख निर्माण झाली.
अमायराची बंगळुरू येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये निवड झाली होती. या केंद्रात निवड झालेली ती सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली होती. मडगावच्या भाटीकर मॉडेल हायस्कूलची विद्यार्थिनी असलेली अमायरा सध्या बंगळुरू येथील इन्फोसिस बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. राष्ट्रीय स्तरावरील या सुवर्णपदकामुळे तिच्या क्रीडा वाटचालीत आणखी एक महत्त्वाची उपलब्धी नोंदवली गेली आहे.
Comments are closed.