ॲमेझॉन कर्मचारी मोठ्या प्रमाणात कपात करते

30 हजारांना कमी करणार, प्रक्रियेचा झाला प्रारंभ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘अमेझॉन’ या ऑन लाईन विक्री कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या कार्यान्वयनाला प्रारंभ झाला असून कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्याचा संदेश कशा प्रकारे द्यायचा, याचे प्रशिक्षण व्यवस्थापकांना दिले गेले आहे. त्यानुसार मंगळवारपासून कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याचे ईमेल्स पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये ही कर्मचारी कपात करण्यात येत आहे.

अमेझॉनकडे 35,000 कर्मचारी आहेत. त्यांच्यापैकी जवळपास 10 टक्के कर्मचाऱ्यांना आता कमी करण्यात येत आहे. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. कमी करण्यात येत असलेले सर्व कर्मचारी हे कंपनीचे थेट कर्मचारी (कॉर्पोरेट एम्प्लॉईज) आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये ही कर्मचारी कपात केली जात आहे. मानवसंसाधन, ऑपरेशन्स, साधने आणि सेवा, वेब सेवा अशा विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे.

सर्वाधिक कपात एचआर विभागात

केवळ एकट्या एचआर (मानवसंसाधन) विभागातील 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येत आहे. ही संख्या या विभागातील एकंदर कर्मचारी संख्येच्या 15 टक्के आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जास्सी यांनी काही महिन्यांपूर्वीच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचे संकेत दिले होते. कंपनीला सध्याच्या परिस्थितीत खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करण्यावाचून दुसरा पर्याय नाही, ही बाब त्यांनी त्यावेळी स्पष्ट केली होती.

कपातीचे हे दुसरे सत्र

2022 पासूनच कंपनीने कर्मचाऱ्यांना कमी करण्याची प्रक्रिया हाती घेतली होती. तेव्हापासून आतापर्यंत 27 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. मात्र, आता त्याहीपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना अल्प कालावधीत कमी करण्यात येत आहे. कंपनी आणखी कपात करणार नाही, अशी शक्यता आहे. मात्र, त्याविषयी कोणतीही निश्चिती नाही, अशीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

तीन महिन्यांचे वेतन, लाभ

कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे पूर्ण वेतन आणि इतर लाभ देण्यात येत आहेत. व्यवस्थापकीय पदांवरील कर्मचाऱ्यांचीही कपात काही प्रमाणात करण्यात येत असून कंपनीने त्याविषयी सविस्तर माहिती आपल्या वेबसाईटवर दिल्याचे प्रतिपादन केले आहे. व्यवस्थापकीय स्तर कमी करण्याचा कंपनीचा विचार असून त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येत आहेत.

भारतावर किती परिणाम…

अमेझॉन ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. भारतातही कंपनीचा व्यवसाय आहे. तथापि, अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतात या कंपनीचा विस्तार कमी आहे. त्यामुळे या कर्मचारी कपातीचा फार मोठा फटका भारताला बसणार नाही, असे अनुमान आहे. ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा या देशांमधील कर्मचाऱ्यांना या कपातीचा सर्वाधिक फटका बसत आहे, ही परिस्थिती आता उघड होत आहे.

Comments are closed.