भरपावसात श्री अंबाबाई-त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा

शारदीय नवरात्रोत्सवातील परंपरेनुसार ललित पंचमीनिमित्त सकाळी दहाच्या सुमारास करवीर निवासिनी श्री अंबाबाई सोन्याच्या सजवलेल्या पालखीतून पारंपरिक लवाजम्यासह आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला बाहेर पडली.पाठोपाठ चांदीच्या पालखीतून श्री तुळजाभवानी माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरू महाराज वाडय़ातील गुरू महाराजांची पालखीही टेंबलाई टेकडीकडे लवाजम्यासह बाहेर पडली. मार्गात ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात स्वागत स्वीकारत दुपारी बाराच्या सुमारास या पालख्या टेंबलाई टेकडीवर दाखल झाल्या.
यावेळी छत्रपतींच्या माजी खासदार व युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती या शाही परिवाराच्या उपस्थितीत गुरव घराण्यातील स्वरा गुरव या कुमारिकेचे पूजन व तिच्या हस्ते कोहळा फोडण्याचा विधी संपन्न झाला.
श्री अंबाबाई आणि श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीचा विधिवत सोहळा संपन्न झाल्यानंतर पालख्या पुन्हा आपापल्या ठिकाणी रवाना झाल्या. त्र्यंबोली भेटीसाठी गजारूढ अंबारीतून श्री अंबाबाई निघते, या परंपरेनुसार श्री अंबाबाईची आज गजारुढ अंबारीतील सालंकृत पूजा बांधण्यात आली.
दरम्यान, आज सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पालखीसाठी नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. टेंबलाई टेकडीवरील देवींच्या भेटीसोहळ्यासह कोहळा फोडण्याच्या विधीला गर्दी कमी राहिल्याचे दिसून आले. तर यानिमित्त भरणाऱ्या जत्रेवरही याचा परिणाम दिसून आला.
पावसाचा श्री अंबाबाईश्री जोतिबा मंदिरांतील गर्दीवर परिणाम
नवरात्रोत्सवामुळे सर्व मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरातही दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. मात्र, शुक्रवारी (दि. 26) दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने आज पहाटेपासूनच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर सर्वत्र रात्री उशिरापर्यंत मुसळधार आणि संततधार पाऊस झाला.त्यामुळे जनजीवनासह मंदिरातील गर्दीवरही परिणाम दिसून येत आहे.
Comments are closed.