Ambadas Danve criticizes Babanrao Lonikar for controversial statement
(Danve on Lonikar) छत्रपती संभाजी नगर : भाजपा आमदार बबनराव लोणाकर यांनी एका भाषणात सोशल मीडियावर विरोधात पोस्ट करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले होते. पण त्यावेळी त्यांची जीभ घसरली आणि त्यामुळे ते पुन्हा ट्रोल होत आहेत. विरोधकांनीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही, ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती असल्याचे लोणीकर यांना सुनावले आहे. (Ambadas Danve criticizes Babanrao Lonikar for controversial statement)
जालना जिल्ह्यातील परतुर येथे भाषण करत असताना आमदार लोणीकर यांनी, सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात पोस्ट लिहिणाऱ्यांवर आगपाखड केली. “कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच केला आहे. तर, नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बुट-चप्पल सुद्धा सरकारमुळेच आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण..
तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे..
आमदारकी जनतेमुळे..
तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे..
तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे..
नेतेगिरी जनतेमुळे..
विधानसभेतील स्थान जनतेमुळे..यांचे हे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येते आहे! pic.twitter.com/RcSleViNGL
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 26, 2025
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये ‘ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती,’ असे म्हणत बबनराव लोणीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे. कारण, तुमचे कपडे, बूट या जनतेमुळे, आमदारकी जनतेमुळे, तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे, तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे, नेतेगिरी जनतेमुळे असल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे. त्याचबरोबर, महापालिका निवडणूक येत असल्याने लोणीकर यांचे हे वक्तव्य लक्षात ठेवण्याचे आवाहन दानवे यांनी जनतेला केले आहे.
सुषमा अंधारेंची टीका
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही, हॅशटॅग लाचार असे म्हणत आमदार बबनराव लोणीकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तुमचा आत्मसन्मान खुशाल गहाण ठेवा, जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे. जनता कष्टाने कमवून खाते, पण तुम्ही भ्रष्टाचार करून खाता, असे त्यांनी सुनावले आहे. सत्ताधाऱ्यांना कुर्निसात करताना खुशमस्करे नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. पाठीचा कणा हरवलेले लोणीकर यांच्यासारखे कळपाने सापडतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Comments are closed.